
सासवडमध्ये अकॅडमीतील विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला; धक्कादायक कारणही समोर
सासवडमधील एका अकॅडमीत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या एका विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला केल्याने त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत. त्याने मित्रांना त्याच्या खोलीवर पार्टी करण्यास आणि सिगरेट ओढण्यास नकार दिल्याच्या रागातून त्याच्याच मित्रांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे जखमी विद्यार्थ्याचे कुटुंब अक्षरशः हादरून गेले असून, विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. मुलांना शिक्षणासाठी कोणाच्या भरवशावर बाहेर पाठवायचे हाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
ज्ञानेश्वर सचिन मोटे (मुळगाव मळद, ता. बारामती) असे जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. यासंदर्भात ज्ञानेश्वरचे वडील सचिन भागवत मोटे (रा. मळद, ता. बारामती) यांनी सासवड पोलिसांत घटनेची फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी आकाश बाळु बोरावके (रा. माळशिरस ता.पुरंदर) यश हनुमंत कोतवाल (पूर्ण पत्ता माहीत नाही) व त्यांचा एक अनोळखी मित्र अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जखमी विद्यार्थी सासवड येथील एका अकॅडमीमध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत असून, सस्ते असोसिएशन पार्क मध्ये फ्लँट नं ६ मध्ये इतर मित्रांसमवेत राहत आहे. दिनांक १७ रोजी रात्री ८ च्या सुमारास जखमी ज्ञानेश्वर हा रूममधील इतर मित्रांसमवेत खोलीवर असताना त्याचे पूर्वीचे रूम पार्टनर तिथे आले आणि आम्हाला पार्टी करायची आहे असे म्हणाले. त्यावर सर्वांनी त्यांना पार्टी करण्यास नकार दिला. त्यामुळे ते तिघेही निघून गेले. त्यानंतर जखमीसह त्याचे मित्र शेजारील मेसवर जेवन करुन रुमच्या खाली आले होते.
खाजगी रुग्णालयात तातडीने दाखल
त्यापैकी इतर दोघे मित्र परत रूम वरती गेले आणि जखमी ज्ञानेश्वर मोबाईल पाहत खालीच थांबला होता. दरम्यान रात्री साडे नऊच्या सुमारास ज्ञानेश्वर जखमी अवस्थेत रुमवर धावत आला. आणि मघाशी रुमवर पार्टी करायची आहे, असे म्हणालेल्या तिघांना “मी सिगारेट ओढु नका “असे म्हणालेच्या कारणावरुन त्यांनी शिवीगाळ दमदाटी करुन धारदार शस्त्राने डोक्याच्या पाठीमागील बाजुस मानेजवळ तसेच उजव्या खांद्याच्या खाली वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. त्यामुळे इतर मित्रांनी घाबरलेल्या अवस्थेत त्याच्या घरी वडिलांना फोन करून घटनेची माहिती देऊन ज्ञानेश्वर याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात तातडीने दाखल केले.