
अंगणात पाणी सांडल्यावरून तुफान हाणामारी (Photo Credit - X)
पाण्यासाठी वादाची ठिणगी
१९ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ च्या सुमारास विशाल वाघ यांच्या घरात पहिल्या मजल्यावरून नळाला आलेले पाणी भरत असताना काही पाणी त्यांच्या अंगणात पडत होते. यावरून समोर राहणाऱ्या गोरख राठोड (५५) यांनी “पाणी खाली पडू देऊ नका, आमच्या अंगणात पाणी होत आहे,” असे म्हणून आक्षेप घेतला. यावर विशालच्या आई, सविता वाघ यांनी “यावेळेस राहू द्या, पुढच्यावेळी पाणी पडू देणार नाही,” असे म्हणून समजावण्याचा प्रयत्न केला.
डोके फोडून जीवे मारण्याची धमकी
सविता वाघ यांच्या या उत्तरामुळे संतप्त झालेल्या गोरख राठोड यांच्यासह संदिप राठोड, शिला राठोड, दयाळू राठोड, दिनेश राठोड, कमलाबाई राठोड, उषा राठोड आणि सौरभ राठोड (सर्व रा. मुकुंदवाडी) यांनी सविता वाघ यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली.
हा प्रकार पाहून फिर्यादी विशाल वाघ आपल्या आईला सोडवण्यासाठी धावून आले असता, गोरख राठोड घरातून लाकडी दांडा घेऊन आला आणि त्याने विशालच्या डोक्यात जबर वार करून त्याचे डोके फोडले. या हाणामारीत विशालचा भाऊ धीरज वाघ सोडवण्यासाठी आला असता, आरोपी संदिप राठोडने त्यालाही मारहाण केली, तर गोरख राठोडने त्याच दांड्याने धीरजच्या हाताच्या मनगटावर वार केला.
मारहाण करून झाल्यावर आरोपींनी, “पोलिसात तक्रार केली तर जिवंत सोडणार नाही, इथे कसे राहतात ते दाखवतो,” अशी धमकी दिली. या प्रकरणी सर्व आठ आरोपींविरुद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक निरीक्षक बहुरे करत आहेत.