
फटाके फोडत असतानाच तरुणावर गुंडाने केला चाकू हल्ला; पोटावर सपासप वार केले अन्...
नागपूर : फटाके फोडत असलेल्या एका तरुणावर माथेफिरू गुंडाने चाकू हल्ला केला. गुंडाने पोटावर वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही धरारक घटना यशोधरानगर पोलिस ठाण्यांतर्गत समतानगर परिसरात घडली. पोलिसांनी आरोपी शेख इकराम उर्फ मेजर शेख मुश्ताक (वय २२, रा. प्रवेशनगर) याला अटक केली. जखमी रिवायत अकबर शेख खान (वय २१, रा. अजीज कॉम्प्लेक्स, यशोधरानगर) याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रिवायत याची यशोधरानगर चौकातच रेडिमेड कपड्यांची दुकान आहे. मंगळवारी रात्री तो दुकान बंद करून घरासमोर बसलेला होता. या दरम्यान काही मित्र फटाके फोडत होते. रिवायतही त्यांच्यासोबत मिळून फटाके फोडू लागला. दरम्यान, परिसरातील एका दुकानदाराने त्यांना आग लागण्याच्या भीतीने दुसरीकडे जाऊन फटाके फोडण्यास सांगितले. रिवायत आणि त्याचे मित्र समतानगर मैदानात फटाके फोडण्यासाठी गेले. आरोपी इकराम आधीच तेथे बसलेला होता. रिवायत आणि त्याच्या मित्रांना फटाके फोडताना पाहून इकरामने शिवीगाळ करत दगड फेकून मारण्यास सुरूवात केली.
रिवायतने जाब विचारला असता इकरामने त्याच्याशी वाद घातला. चाकू काढून रिवायतचे पोटावर वार केले. रक्तबंबाळ अवस्थेत रिवायतने जीव मुठीत धरून तेथून पळ काढला. जवळच असलेल्या एका घरात जाऊन लपला. काही लोकांनी त्याला त्याच्या घरी पोहोचवले. कुटुंबीयांनी तत्काळ त्याला उपचारार्थ मेयो रुग्णालयात दाखल केले. यशोधरानगर पोलिस घटनास्थळी पोहोचले. रिवायतच्या जबाबावरून इकरामविरुद्ध खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवत त्याला अटक केली.
नेवासा तालुक्यात एका तरुणावर जीवघेणा हल्ला
दुसऱ्या एका घटनेत, नेवासा तालुक्यातील सोनई येथे मातंग समाजातील तरुण संजय नितीन वैरागर याच्यावर काही समाजकंटकांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात संजय वैरागर गंभीर जखमी झाले असून, त्यांना तत्काळ अहमदनगर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बहुजन जनता पक्षाने केली आहे.
हेदेखील वाचा : धक्कादायक ! पोरानेच केला बापाचा ‘सायबर गेम’! लावला ‘इतक्या’ लाखाचा चुना; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण