
मुखपाठ फाट्याजवळ भीषण अपघात! बसची ट्रेलरला धडक, पुढचा भाग चक्काचूर; जखमींचा आकडाही समोर
अजिंठा : छत्रपती संभाजीनगरहून जळगावकडे जाणाऱ्या एसटी बसने पोकलेन घेऊन जाणाऱ्या अवजड ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने सोमवारी (दि. २८) सकाळी सुमारे नऊ वाजता मुखपाठ फाट्याजवळ भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत बसमधील २१ प्रवासी जखमी झाले आहेत. बसच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. अपघाताचा आवाज होताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
सोमवारी ४५ प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस (एमएच ०६ बीडब्ल्यू १२३६) मुखपाठ फाट्याजवळ आली असता पुण्याहून पहूरकडे पोकलेन घेऊन जाणाऱ्या ट्रेलरला (एनएल ०१ एल ७६१५) बसने पाठीमागून धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की बसचा पुढील भाग मोठ्या प्रमाणात उद्धवस्त झाला. अचानक झालेल्या अपघातामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. बस चालक रतन महादेव कोळी यांनी बसचे ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याचे सांगितले. ट्रेलर चालक राजू पार (रा. फत्तेपूर, उत्तर प्रदेश) हेदेखील किरकोळ जखमी झाले. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून पोलिसांच्या मदतीने अजिंठा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मोसीन पठाण, फकीरा खान, महेबुब खान, शेख आवेज, महमू खान, काजिम खान, रफीक खान, गफार खान, शेख अजिंज, शंकर ढकरे, भास्कर बिरारे, रवि मगरे व मिलिंद बिरारे आदींनी मदतकार्य केले. अपघातानंतर बस व ट्रेलर महामार्गावरच उभे राहिल्याने दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांब रांगा लागल्या. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. अजिंठा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पवन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदारांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक दिनाजी खंदारे, डॉ. अमोल गिरी, डॉ. महेश राठोड व आरोग्य कर्मचाऱ्यांनी जखमींवर उपचार केले.
सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव
मुखपाठ फाट्यापासून वाघूर नदी पुलापर्यंत महामार्गाचे काम सुरू आहे. मात्र, कामाच्या ठिकाणी वाहनचालकांना पूर्वसूचना देणारे सूचनाफलक, धोक्याचे इशारे व सुरक्षा चिन्हांचा अभाव असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्यामुळे अपघाताचा धोका वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कामाच्या ठिकाणी तातडीने आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
हे सुद्धा वाचा : पुरंदरमध्ये खळबळ! धमकी देत अल्पवयीन तरुणीवर अत्याचार; हॉटेलमध्ये नेले अन्…
अशी आहेत अपघातामधील जखमींची नावे
जखमींमध्ये अर्जुन हरी कुमावत, साहेबराव रूपचंद धनगर, सचिन दिलीप कांबळे, छाया रामभाऊ पाटील, द्वारकाबाई विश्वनाथ कुमावत, युक्ता जितेंद्र कपाडे, मिराबाई जगन कुमावत, मंगला मनोज कुमावत, वैभवी रामदास काटे, प्रमिला दगडू सोनटक्के, उमा रितेश परदेशी, कृष्णा उमेश परदेशी, शांताबाई लालसिंग परदेशी, मेघा उमेश परदेशी, अब्दुल हमीद अब्दुल रहमान, अमर मनोहर खोचे, रुस्तम तुळशीराम गोंगे, लक्ष्मण शिंदे, हनुमान अशोक बाविस्कर, गोपाल दत्तात्रय फुके व लालसिंग बहादूरसिंग परदेशी यांचा समावेश आहे.