
एसटी बसचा भीषण अपघात, ब्रेक निकामी झाल्याने बस खड्ड्यात उलटली; जखमींचा आकडाही समोर
एमएच ४० / वाय ५१८३ क्रमांकाची एसटी बस गुरुकुंज मोझरी येथून अमरावतीच्या दिशेने जात होती. बसमध्ये २० ते २२ प्रवासी प्रवास करीत होते. यावेळी सालोरा-धोत्रा गावादरम्यान अचानक बसचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्यात उलटली. अचानक घडलेल्या या अपघातामुळे बसमधील प्रवाशांमध्ये एकच आरडाओरड सुरू झाली. घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
स्थानिक नागरिकांनी बचावकार्य सुरू केले
अपघाताची माहिती मिळताच सालोरा, धोत्रा आणि शिरजगाव परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. काही वेळातच कुर्हा पोलिस, एसटी महामंडळाचे अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्तेही घटनास्थळी दाखल झाले. सर्वांनी मिळून बचावकार्याला गती दिली. जखमी प्रवाशांना बसमधून बाहेर काढून उपचारासाठी पाठविण्यात आले.
या अपघातामुळे एसटी बसच्या तांत्रिक स्थितीचा आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. धावत्या बसचे ब्रेक निकामी होण्याचे नेमके कारण काय, याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. एसटी महामंडळाने बसच्या देखभाल-दुरुस्तीबाबत अधिक दक्षता घ्यावी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आमदारांच्या पत्नींकडून जखमींची विचारपूस
अपघाताची माहिती मिळताच आमदार राजेश वानखडे यांच्या पत्नी आरती वानखडे यांनीही घटनास्थळी भेट दिली. त्यांनी जखमी प्रवाशांची विचारपूस केली. तसेच जखमींना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यासाठी पुढाकार घेतला. जखमी प्रवाशांना प्राथमिक उपचारासाठी अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Ans: गुरुकुंज मोझरी येथून अमरावतीकडे जाणाऱ्या एसटी बसचा मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास सालोरा-धोत्रा गावादरम्यान अपघात झाला.
Ans: या दुर्घटनेत ८ ते १० प्रवासी जखमी झाले असून, बसचालक आणि वाहकालाही किरकोळ दुखापत झाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Ans: प्राथमिक माहितीनुसार, बसचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यालगतच्या खड्यात उलटली.