पुणे : राज्यात फसवणुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून फसवणुकीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातील धनकवडी भागात एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाकडील एटीएम कार्डचा गैरवापर करुन चोरट्याने खात्यातून ५५ हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना घडली आहे. दरम्यान एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना चोरट्यांनी लक्ष्य केले असल्याचे यावरून दिसत आहे. याबाबत ६७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक आंबेगाव परिसरात राहायला आहेत. रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ते पुणे-सातारा रस्त्यावरील एटीएम केंंद्रात रोकड काढण्यासाठी गेले होते. त्यांच्या मागोमाग चोरटा एटीएममध्ये शिरला. एटीएममधून रोकड काढणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला मदत करण्याचा बहाणा चोरट्याने केला. चोरट्याने ज्येष्ठाकडील एटीएम कार्ड आमि सांकेतिक शब्द घेतला.
चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाकडील एटीएम कार्ड स्वत:कडे ठेवले. त्यानंतर चोरट्याने त्याच्याकडील कार्ड वापरुन एटीएमधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. एटीएममधून पैसे निघत नसल्याचे सांगून चोरट्याने त्याच्याकडील कार्ड ज्येष्ठाला दिले. ज्येष्ठ नागरिक तेथून गेल्यानंतर चोरलेल्या एटीएमचा गैरवापर करुन खात्यातून ५५ हजार रुपये चोरुन नेल्याचे समजले. पोलीस उपनिरीक्षक कल्पना काळे अधिक तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : पुणे हादरलं! भवानी पेठेत तिघांवर खुनी हल्ला, बुक्कीने तीन दात पाडले
मनीलॉन्ड्रींगच्या धाकाने सहा लाख उकळले
मगरपट्टा येथील एका तरुणीला आधार कार्डचा गैरवापर करून त्याद्वारे मनी लॉन्ड्रींग झाले आहे. यामुळे यात तुम्हाला अटक करावे लागेल असे सांगून सायबर चोरट्यांनी तरुणीकडून 8 लाख 89 हजार रुपये उकळले आहेत. याप्रकरणी 24 वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार हडपसर पोलिसांनी सायबर चोरट्यांच्या विरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. सायबर चोरट्याने राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विभागातून बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या नावाने मनीलॉन्ड्रींग झाले असून, आधार कार्डचाही गैरवापर करण्यात आला आहे. तुम्हाला अटक होऊ शकते असे धमकावून केस क्लिअर करण्यासाठी एनओसी सर्टीफिकेट देतो असे सांगून तरुणीकडून 5 लाख 89 हजार रुपये उकळल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अमर काळंगे करीत आहेत.
गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची फसवणूक
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी महिलेची ४३ लाख ३९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका महिलेने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.