दुर्दैवी! बांधकाम मजूराच्या खांद्यातून सळई आरपार; पुण्याच्या एरंडवणे भागातील घटना
पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. एरंडवणे परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत मजूर २० ते २५ फूट उंचावरुन खड्ड्यात पडला. तेव्हा खड्यात असलेली सळई या मजुराच्या खांद्यातून आरपार घुसली. त्यात तो गंभीर जखमी झाला. सुदैवाने अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत त्याला तातडीने मदत करुन रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे त्याला वेळेवर उपचार मिळण्यास मदत झाली आहे.
एरंडवणे येथील शारदा सेंटर येथे एका बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. बुधवारी दुपारी बांधकामाच्या ठिकाणी २० ते २५ फूट उंचीवरुन मजूर खड्ड्यात पडला. खड्ड्यात सळई होत्या. त्यातील एक सळईच मजूराच्या खांद्यातून आरपार गेली. यात तो गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच एरंडवणे अग्निशमन केंद्रातील जवान सचिन क्षीरसागर, अनंत जाधव, सचिन आयवळे, सागर मुंढे, राहुल वाघमोडे, आशुतोष पिंगळे, निलेश पाटील, कमलेश माने, सुमित कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
जवानांनी जखमी अवस्थेतील मजूराला खड्ड्यातून बाहेर काढले. त्याच्या खांद्यात शिरलेल्या सळईचा एक भाग हायड्रोलिक यंत्राचा वापर करुन कापला. जवानांनी त्याच्याशी संवाद साधत धीर देऊन एका रुग्णालयात दाखल केले. अग्निशमन दलाच्या जवानांच्या तत्परतेमुळे जखमी कामगाराला तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध झाली.
हे सुद्धा वाचा : लाचेच ‘एक’ प्रकरण, दोन सरपंच जाळ्यात; काय आहे प्रकरण?
दीर- भावजयचा मृत्यू
गेल्या काही दिवसाखाली पुण्यातील जेल रोडवरील एका रुग्णालयासमोर गेल्या काही दिवसाखाली भरधाव कारने दिलेल्या धडकेत दीर भावजयीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लोहगाव परिसरातील जेल रस्त्यावरील संजय पार्क येथे हा अपघात गुरूवारी सकाळी झाला. याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशीर्वाद गोवेकर (वय ५२), रेश्मा गोवेकर (वय ४७) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. याप्रकरणी कारचालक अचलकुमार (वय ४३) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत प्रसाद गोवेकर (वय ५४, रा. शिव पार्वती मंगल कार्यालयाजवळ, गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
महिला पोलिसाला कारने उडवले
गेल्या काही दिवसाखाली ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाईनिमित्त नाकाबंदी करून कारवाई करत असताना एका भरधाव आलिशान कारने कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक विभागातील महिला कर्मचाऱ्याला उडविल्याची धक्कादायक घटना घडली. यात महिला कर्मचारी गंभीररित्या जखमी झाल्या असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आलिशान कारमध्ये चौघेजन असल्याचे माहिती समोर आली. महिला अंमलदार दीपमाला राजू नायर (वय ३५) असे गंभीर जखमी झालेल्या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.