संग्रहित फोटो
पुणे : पुण्यनगरी अन् ग्रामीण भागात लाचेच्या सापळा कारवाया वाढत असतानाच लाचेच ‘एक’ प्रकरण अन् जाळ्यात अडकले दोन सरपंच असा आगवेगळा कारवाईचा फास पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केला आहे. सरपंच पत्नीच्या पतीला १६ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. वेल्हा तालुक्यातील मौजे वरघड येथील महिला सरपंच पती व त्यांना प्रोत्साहन देणारे गिवशी आंबेगाव येथील सरपंचाना पकडण्यात आले आहे. या कारवाईने ग्रामीण भागात चांगलीच चर्चा रंगली आहे.
वरघड ग्रामंपचायतीच्या महिला सरपंचाचे पती नथुराम कोंडीबा डोईफोडे (वय ३२, रा. रायकरमळा, धायरी गाव) व वेल्हातील गिवशी आंबेगावचा सरपंच बाळासाहेब धाबू मरगळे (वय ३३, किरकटवाडी, हवेली) अशी पकडलेल्या दोघांची नावे आहेत. ही कारवाई सिंहगड रस्त्यावरील नांदेडसिटी गेटच्या समोरच्या बाजुस असलेल्या अतुल्य हॉटेलच्या पार्कींगमध्ये केली.
तक्रारदार यांनी वेल्ह्यातील वरघड गावात जमीन खरेदी केली आहे. त्या जमीनीवर पुर्वीच्या मालकाचे नाव आहे. हे नाव घराच्या गाव नमुना ८ उतर्यावरून कमी करायचे होते. त्यासाठी तक्रारदाराने वरघड ग्रामपंचायतीकडे पुर्वीच्या मालकाचे नाव कमी करावे, असा अर्ज केला होता. त्या अनुषंगाने तक्रारदार वरघड गावची सरपंच महिला सुवर्णा नथुराम डोईफोडे व त्यांचे पती नथुराम यांना भेटले. तक्रारदारांच्या कामासाठी व तसा ठराव ग्रामपंचायतीच्या बैठकीत घेण्यासाठी महिला सरपंच व तिच्या पतीने तक्रारदारांकडे १८ हजारांची लाचेची मागणी केली. नंतर तक्रारदारांनी याबाबत एसीबीकडे तक्रार केली.
एसीबीने पडताळणी केली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानूसार सापळा कारवाईत सरपंचाचा पती नथुराम तडजोडीअंती १६ हजार रुपयांची लाच घेताना जाळ्यात अडकला. तेव्हाच लाच घेण्यासाठी प्रोत्साहन देणारा गिवशी गावचा सरपंच बाळासाहेब मरगळे यालाही ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर पुढील कारवाई सुरू आहे.
हे सुद्धा वाचा : गुन्हे शाखेच्या युनिट 6 ची मोठी कारवाई; घरफोड्या करणार्या दोघांना ठोकल्या बेड्या
पाच हजारांची लाच घेताना पकडले
राज्यात लाच घेणाऱ्याविरुद्ध मोठ्या प्रमाणात कारवाई होताना दिसत आहे. लाच घेतल्याचे अनेक प्रकार उघडकीस येत आहेत. अशातचं गेल्या काही दिवसाखाली सातबारा उताऱ्यावरील नोंदीसाठी तलाठ्यासाठी पाच हजारांची लाच घेणाऱ्या एकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले आहे. फुरसुंगीतील तलाठी कार्यालयाच्या आवारात ही कारवाई केली. याप्रकरणी ठकसेन उर्फ तुषार मारुती गलांडे (वय 42, रा. नारायणनगर, फुरसुंगी, हडपसर) याच्यावर हडपसर पोलिसात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वाये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.