संग्रहित फोटो
पुणे : पुण्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, वाढत्या चोरीच्या, लुटमारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. जमीन खरेदी विक्री करणाऱ्या व्यवसायिकावर दुचाकीवरून येऊन गोळीबार करत तिघांनी त्यांच्याकडील ११ लाख रुपये किंमतीचे २२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. व्यावसायिक त्यांच्या कारमध्ये होता तरीही चोरट्यांनी त्यांच्या खिडकीजवळ येऊन गोळी झाडली. गोळीबारात काच फुटून त्यांना लागली.
गोळीबारात व्यवसायिक संतोष ज्ञानोबा गावडे (वय ५०, रा. गावडेवाडी, शिरसवाडी, ता. शिरुर) हे जखमी झाले आहेत. त्यांच्या तोंडाला गोळी लागली आहे. त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी संतोष यांचे चुलत बंधू दत्तात्रय गावडे (वय ५०) यांनी लोणीकंद पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिघा अनोळखी चोरट्यांविरुद्ध आर्म ॲक्टनुसार खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बुधवारी (दि.5) रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास गावडेवाडी शिरसवाडी येथील पंडीत गावडे यांच्या बंगल्यासमोर घडली आहे.
संतोष गावडे यांचा जमीन -खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचे वाडेबोल्हाई चौकात ऑफिस आहे. नेहमीप्रमाणे ऑफिस बंद करून आपल्या कारने घराकडे निघाले होते. रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास पंडीत गावडे यांच्या घराजवळ आले असताना, दुचाकीवरून आलेल्या तिघांपैकी एकाने संतोष यांच्यावर गोळी झाडली. गोळी झाडल्याने कारची काच फुटली. गोळी त्यांच्या चेहऱ्याला लागली. गंभीर जखमी झाल्याने संतोष कारमध्येच होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील २२ तोळे वजनाच्या सोन्याच्या दोन सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून पळ काढला. संतोष यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त अबिनाश कुमार, गौहर हसन, डॉ. प्रशांत अमृतकर यांच्यासह अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. अद्याप आरोपी फरार आहेत. गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांची पथके आरोपींचा शोध घेत आहेत.
हे सुद्धा वाचा : मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, फॉर्च्युनरचा चुराडा; एकाचा मृत्यू






