सौजन्य - नवराष्ट्र टीम
पिंपरी : जागतिक स्तरावर महत्त्वाचे आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी आयटी पार्कच्या सुरक्षा व्यवस्थेची कसून चाचणी घेण्यासाठी भारतीय नॅशनल सिक्युरिटी गार्ड (एनएसजी), महाराष्ट्र फोर्स वन, अमेरिकन सैन्य दलाचे कमांडो तसेच विविध सुरक्षा यंत्रणांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (५ ऑगस्ट) सायंकाळी विशेष मॉकड्रिल आयोजित करण्यात आले. सायंकाळी ४ ते रात्री ९ या पाच तासांच्या सरावादरम्यान परिसरात कडेकोट बंदोबस्त असल्याने काही काळ नागरिकांमध्ये खळबळ उडाली.
हिंजवडी फेज-दोनमधील इन्फोसिस कॅम्पसमध्ये दहशतवादी हल्ल्याची काल्पनिक परिस्थिती निर्माण करून या मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. माण-हिंजवडी परिसरातील कंपनीच्या आवारात अमेरिकन सैन्य दलाचे १७ जवान, एनएसजीचे १०० हून अधिक कमांडो, महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (एटीएस), फोर्स वन, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकारी आणि इतर सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी सहभागी झाले होते.
कोणत्याही आपत्कालीन अथवा दहशतवादी हल्ल्यासारख्या गंभीर परिस्थितीत विविध सुरक्षा यंत्रणांमधील समन्वय, प्रतिसादाची गती आणि बचाव कार्याची कार्यक्षमता तपासणे हा या सरावाचा मुख्य उद्देश होता. मॉकड्रिलदरम्यान एनएसजी कमांडोंनी अत्याधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक शस्त्रसज्जता आणि विशेष युद्धतंत्रांचा वापर करून विविध बचाव आणि प्रतिकारात्मक कारवायांचे प्रात्यक्षिक सादर केले. स्थानिक पोलिस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनीही या सरावात सक्रिय सहभाग घेतला.
हिंजवडी आयटी पार्कमध्ये देश-विदेशातील अनेक नामांकित आयटी कंपन्यांची कार्यालये असून, हजारो कर्मचारी दररोज येथे कार्यरत असतात. त्यामुळे हा परिसर संवेदनशील मानला जातो. अशा परिस्थितीत संभाव्य सुरक्षाधोक्यांना प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी विविध सुरक्षा दलांमध्ये समन्वय वाढविणे आणि आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवणे आवश्यक असल्याने या संयुक्त सरावाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
सायंकाळच्या वेळेत अचानक लष्करी वाहने, कमांडोंची हालचाल आणि कडक पोलीस बंदोबस्त पाहून अनेक नागरिक व कर्मचारी काही काळ चिंतेत पडले. मात्र, हा केवळ नियोजित मॉकड्रिल असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. या सरावामुळे हिंजवडी आयटी पार्कमधील सुरक्षा व्यवस्थेची तयारी आणि विविध यंत्रणांमधील समन्वयाची प्रभावी चाचणी पार पडल्याचे सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले.
हे सुद्धा वाचा : पुण्यातील बाणेरमध्ये एकाचा खून, चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं; कारण…






