नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांना भरधाव दुचाकीची धडक, दोन पोलिसांसह चौघे जखमी
पुणे : सोलापूर-पुणे रस्त्यावर भल्या पहाटे वाहन तपासणीसाठी नाकाबंदीवर असलेल्या पोलिसांना भरधाव दुचाकीने धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात एक पोलीस कर्मचारी गंभीररित्या जखमी झाला आहे. तर, दुचाकी चालक तरुणासह त्याची मैत्रिण देखील जखमी झाली आहे. याप्रकरणी दुचाकीस्वार तरुणावर हडपसर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कर्मचारी संकेत गांगुर्डे, पोलीस हवालदार बारटक्के, मोटारचालक चेतन सिंग, दुचाकीवरील सहप्रवासी सायली टिंगे अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याबाबत मनोहर भाऊ ओंबासे (वय ३९, रा. फुरसुंगी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी दुचाकीस्वार तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, सोलापूर महामार्गावरील मांजरी भागात महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या प्रवेशद्वार येथे विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी लावण्यात आली आहे. त्याठिकाणी पोलीस अंमलदार संकेत गांगुर्डे व त्यांचे सहकारी ड्युटी बजावत होते. लोखंडी बॅरिकेट्स उभा करून पोलीस वाहने चेकींग करतात. दरम्यान, पहाटे पाचच्या सुमारास वाहन तपासणी सुरू होती. तेव्हा लोणी काळभोर टोलनाक्याकडून भरधाव दुचाकीवर आलेल्या कार्तिकचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्याने लोखंडी बॅरिकेट्सला धडक दिली. पोलीस कर्मचारी संकेत गांगुर्डे, बारटक्के, तसेच कारमधून उतरुन तपासणीसाठी थांबलेले कारचालक चेतन सिंग यांना धडक दिली. दुचाकीवरील सहप्रवासी तरुणी सायली टिंगे पडल्याने तिला दुखापत झाली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता दुचाकी चालक पसार झाला. सहायक निरीक्षक रोकडे अधिक तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : पतीने नोकरीचे आमिष दाखवत तरुणींना पुण्यात आणलं अन् थेट कुंटणखान्यात…; पुणे पोलिसांची मोठी कारवाई
टेम्पोने तिघांना उडविले
पुण्यात अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज अपघाताच्या घटना उघडकीस येत आहेत. अशातचं गेल्या काही दिवसाखाली सातारा-पुणे महामार्गावरील मांगडेवाडी गावाच्या परिसरात रस्त्याच्या कडेला महिला पतीसह मैत्रिणीशी गप्पा मारत उभा असताना भरधाव पॅगो टेम्पोने उडविले. या भीषण अपघातात महिलेचा मृत्यू झाला, तर दाम्पत्य जखमी झाले आहेत. दिपाली वैभव बर्गे (वय ४५) अशी मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर, आदीनाथ वायदंडे (वय ५९) हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात चालक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पार्वती वायदंडे (वय ५०) यांनी तक्रार दिली आहे. ९ नोव्हेंबर रोजी पावणे आठच्या सुमारास हा अपघात घडला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पर्वती व दिपाली या मैत्रिणी आहेत. पार्वती व त्यांचे पती हे मांगडेवाडी येथून जात होते. तेव्हा मैत्रिण दिपाली भेटली. त्यामुळे तिघेही ते रस्त्याच्या कडेला उभे राहून गप्पा मारत होते. त्याच दरम्यान, पाठिमागून भरधाव आलेल्या टेम्पोने त्या तिघांनाही जोराची धडक दिली. या धडकेत पार्वती या गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर टेम्पो चालक पसार झाला आहे. नागरिकांनी तिघांनाही जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र, गंभीर मार लागल्याने दिपाली यांचा मृत्यू झाला होता. तर, पार्वती यांचे पती आदीनाथ वायदंडे जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या टेम्पो चालकाचा पोलीस शोध घेत आहेत.