पुणे : बालेवाडी भागातील सोसायटीत घरफोडी करण्यासाठी आलेला चोरटा पहिल्या मजल्यावरुन खाली पडला आणि गंभीर जखमी झाला आहे. तो पंधरा ते वीस फुटावरुन पडला. चोरट्याला रहिवाशांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. चोरट्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बप्पा सरकार (वय ३२, सध्या रा. मुंबई) असे जखमी चोरट्याचे नाव आहे. याबाबत एका रहिवाशाने बाणेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार बालेवाडी भागातील इयाॅन सोसायटीतील पहिल्या मजल्यावर राहायला आहेत. गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास सरकार सोसायटीच्या आवारात शिरला. सोसायटीतील पाइपच्या आधारे तो पहिल्या मजल्यावर गॅलरीत उतरला. आवाज झाल्याने तक्रारदार झोपेतून जागे झाले आणि त्यांनी गॅलरीतून डोकावून पाहिले. तेव्हा या चोरट्याने तक्रारदार जागे झाल्याचे पाहून पाइपवरुन उतरून पसार होण्याचा प्रयत्न केला.
मात्र तो पंधरा ते वीस फुटावरुन कोसळला. सोसायटीच्या आवारात पडला. तक्रारदाराने सोसायटीतील रहिवाशांना जागे केले. सुरक्षा रक्षकांने त्याला पकडले. चौकशी करून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी जखमी अवस्थेतील या आरोपीला रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक चाळले अधिक तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : पुण्यातील गुंडागिरी संपेना! तरुणाच्या गळ्याला कोयता लावला अन्…
महिलांकडील मोबाइल लंपास
पुणे शहरात दुचाकीस्वार चोरट्यानी धुमाकूळ घातला असून, पादचारी महिलांकडील दागिने तसेच मोबाइल चोरून नेण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. प्रभात रस्त्यावरील हिरवाई उद्यान येथे दुचाकीस्वार चोरट्यांनी पादचारी महिलेकडील मोबाइल चोरून नेल्याची घटना घडली. नगर रस्त्यावरील वाघोली भागात दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील साडेतीन लाखांचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेले, तर हडपसरमध्ये ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न झाला. सातत्याने या घटना घडत असताना पोलिसांना मात्र या चोरट्यांचा थांगपत्ता लागत नसल्याचे वास्तव आहे. याप्रकरणी ५२ वर्षीय महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला प्रभात रस्त्यावरील गल्ली क्रमांक १५ परिसरातील सोसायटीत राहायला आहेत. त्या बुधवारी सायंकाळी प्रभात रस्ता परिसरातील हिरवाई उद्यान परिसरात चालायला गेल्या होत्या. तेथून त्या घरी निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या मोबाइलवर वहिनीचा फोन आला. त्यामुळे त्या मोबाइलवर बोलत पायी चालत असताना गल्ली क्रमांक १५ परिसरातील सिंबायोसिस शाळेसमोर महिलेच्या हातातील २० हजारांचा मोबाइल चोरून दुचाकीस्वार चोरटे पसार झाले. चोरट्यांनी हेल्मेट परिधान केले होते. सहायक पोलीस फौजदार राजेंद्र मारणे तपास करत आहेत.