संग्रहित फोटो
पुणे : सिंहगड रोड भागात तरुणाला ‘गाडी हळू का चालवतोय, म्हणत त्याची गाडी अडवून दोघांनी त्याच्या गळ्याला कोयता लावत 50 हजारांची रोकड लुटून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कॅनॉल रोड परिसरात ही घटना घडली असून, ऐन गर्दीच्या वेळीच हा प्रकार घडल्याने नागरिक व येथून जाणाऱ्या वाहन चालकामध्ये भितीचे वातावरण आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका २५ वर्षीय तरूणाने तक्रार दिली आहे. शुक्रवारी (दि.१३) रात्री पावणेदहाच्या सुमारास विठ्ठलवाडी ते वडगाव दरम्यान असलेल्या कॅनॉल रस्त्यावरील संतोष हॉलकडे जाणार्या रोडवर ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, तक्रारदार तरुण शुक्रवारी रात्री दुचाकीवरून घरी निघाला होता. त्यावेळी त्याच्या पाठीमागून दुसर्या दुचाकीवर दोघे आले. ती गाडी चालवणाऱ्याने ‘गाडी हळू का चालवतोय, असे म्हणून तरुणाला दम दिला. शिवीगाळ केली. त्यामुळे या तरुणाने गाडी थांबविली. आरोपींनी त्यांची दुचाकी आडवी लावली. त्यानंतर गाडीवरून खाली उतरून यातील एकाने शिवीगाळ करीत गळ्याला कोयता लावला. तसेच धमकावत खिशात असलेली ५० हजारांची रोकड जबरदस्तीने काढून दोघांनी पळ काढल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर पुढील तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : शेतकऱ्याच्या घरी भरदिवसा चोरी; दागिन्यांसह साडेतीन लाखांचा ऐवज चोरला
राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले
राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली छत्रपती संभाजीनगरमध्ये जुन्या भांडणाच्या कारणातून 26 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. ही घटना सोमवारी (दि.2) सायंकाळी हसूल परिसरातील कारागृहाच्या बाजूच्या मैदानावर घडली. दिनेश उर्फ बबलू परमानंद मोरे (वय 26, रा. चेतनानगर, हसूल) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी अनिकेत गायकवाड व गणेश सोनवणे यांची नावे समोर आली असून, शोधासाठी चार पथके रवाना झाली. या हत्येप्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दोन तरुणांवर कोयत्याने वार
गेल्या काही दिवसाखाली भरदुपारी कर्वे रस्त्यावरील प्रसिद्ध महाविद्यालय परिसरात फिल्मीस्टाईल टोळक्याने हातात कोयते घेऊन पाठलाग करत दोन तरुणांवर कोयत्याने वार केले. यात एका तरुणाची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर, दुसऱ्याला डोक्यात वार करून जखमी केले आहे. भरदुपारी घडलेल्या याघटनेमुळे महाविद्यालय परिसरात चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. धक्कादायक म्हणजे, मैत्रिणीबद्दल अफवा पसरवतोय या संशयावरून टोळक्याने वार केले आहेत. घटनेची माहिती मिळताच परिमंडळ एकचे उपायुक्त संदिपसिंह गिल्ल व डेक्कन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमी असलेल्या तरुणांकडे चौकशी केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, पसार झालेल्या तरुणांचा शोध घेतला जात आहे.