
कराडमध्ये दोन मंडळाच्या कार्यकर्त्यांत जोरदार हाणामारी; कारणही आलं समोर
कराड : कराड येथील अशोक चौक शिंदे गल्ली, शनिवार पेठेत दोन मंडळाच्या कार्यकर्त्यांत मारामारी झाल्याची घटना घडली आहे. गणपती विसर्जन मिरवणूकीत झालेल्या वादाच्या कारणावरून शुक्रवारी रात्री ही घटना घडली आहे. यात एकजण जखमी झाला असून, सहा जणांविरोधात कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत फिर्याद पोलीस शिपाई संदिप कोळी यांनी शहर पोलिसांत दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कराड येथील हिंदूतेज गणेश मंडळ व नवहिंद गणेश मंडळातील कार्यकर्त्यांत गणपती विसर्जन मिरवणूकीत वाद झाला होता. शुक्रवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास याच जुन्या वादातून दोन मंडळाच्या कार्यकर्त्यांत मारामारी झाली. घटनेची माहिती मिळताच फिर्यादी पोलीस शिपाई संदिप कोळी यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी आशोक चौक शिंदे गल्ली येथील रस्त्यावर जमाव जमला होता. एकमेकांना शिविगाळ, आरडाओरडा करीत हाताने मारहाण करण्यात येत होती. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून भांडणे सोडवली, तसेच जमाव पांगवला.
यावेळी सौरभ संजय गोसावी यांच्या उजव्या डोळयाच्या वरती दगड लागल्याने ते जखमी झाले. त्यांच्यावर प्रथम उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. तसेच पुढील उपचारासाठी त्यांना कृष्णा रूग्णालयात दाखल करण्यात आले.
संदिप कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिपक बजरंग विभुते, आदित्य बल्लाळ, समर्थ गोसावी, सुरज संपत नांदे, ऋषिकेश दिपक शिंदे व मंगेश अरूण महाडीक सर्व (रा. शिंदे गल्ली, शनिवार पेठ, कराड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निवडणुकीचा नव्हे; गणपती विसर्जनावेळीचा वाद
नगरपालिका निवडणूकीसाठी अर्ज भरण्याची धामधुम सुरू असतानाच झालेल्या या भांडणाची शहरात जोरदार चर्चा होती. मात्र ही भांडणे निवडणूकीच्या कारणावरून नव्हे; तर गणपती विसर्जनावेळी दोन मंडळाच्या कार्यकर्त्यांत झालेल्या जुन्या वादातून झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. विषेश म्हणजे रात्री झालेल्या भांडणाबाबत दोन्ही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात तक्रार देणे टाळले असल्याने पोलिसांनी स्वत: गुन्हा दाखल केला आहे. कराड शहर पोलीस ठाण्यात दोन्ही मंडळाचे कार्यकर्ते गप्पा मारत एकत्र बसल्याचे पहावयास मिळाले.