सुनेने भावांसोबत मिळून काढला काटा : तिन्ही आरोपी अटकेत
नागपूर : सततची भांडणे आणि संपत्तीच्या हव्यासापायी एका महिलेने चुलत भावांना 2 लाख रुपयांची सुपारी देत सासूचा खून केला. ही थरारक घटना अजनी ठाण्यांतर्गत घडली. सुनीता ओंकार राऊत (वय 54, रा. मित्रनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी सुनेसह तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
हेदेखील वाचा : खळबळजनक ! बापानेच केला पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पोटात दुखतंय म्हणाली अन्…
वैशाली अखिलेश राऊत (वय 32, रा. मित्रनगर), श्रीकांत उर्फ समीर नरेंद्र हिवसे (वय 25) आणि रितेश प्रकाश हिवसे (वय 27, दोन्ही रा. भांडार गोंडी, पांढुर्णा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सुनीता यांचे भाऊ माजी नगरसेवक भगवान भाऊराव मेंढे (वय 57, रा. शिवाजीनगर, हुडकेश्वर) यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनीता यांचे पती ओंकार यांचे 2016 मध्ये निधन झाले. सात वर्षांपूर्वी त्यांनी मुलगा अखिलेशचे वैशाली हिच्याशी लग्न लावून दिले. त्यांना रिद्धिका उर्फ मिष्ठी नावाची 5 वर्षांची मुलगी आहे. दारूच्या अत्याधिक व्यसनामुळे गेल्या वर्षी अखिलेशचाही मृत्यू झाला. तेव्हापासून सुनीता या सून वैशाली आणि नात मिष्टीसोबत दुमजली इमारतीमध्ये राहात होत्या. घरी भाडेकरूही असल्याने त्यांना दरमहिन्याला भाड्याचे 25 हजार रुपये मिळत होते. यातून त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता.
चारित्र्यावर घेत होती संशय
गेल्या काही दिवसांपासून चारित्र्यावर संशय घेत असल्याने यातून होणाऱ्या वादाला वैशाली कंटाळली होती. यातून तिने सुनीताचा काटा काढण्याची योजना बनवली. तिने पांढुर्णा येथे राहणारे चुलत भाऊ श्रीकांत आणि रितेश यांच्याशी संपर्क केला. दरम्यान, 28 ऑगस्टच्या सकाळी फिर्यादी भगवान यांना बहीण सुनीताची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली. भगवान बहिणीच्या घरी गेले असता सुनीता बेडवर मृत पडल्या होत्या. सुनीता यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती वैशालीने दिली. त्यामुळे त्याच दिवशी सुनीता यांच्यावर अंत्यसंस्कारही करण्यात आले.
असा बळावला संशय
या दरम्यान भगवान यांना दोघींमध्ये सतत भांडण होत असल्याची माहिती शेजाऱ्यांकडून मिळाली. एवढेच नव्हे शेजारी राहणाऱ्या अरुणा चव्हाण नावाच्या महिलेने मध्यरात्रीच्या सुमारास मिष्टीचे दोन मामा घरी आले होते. ही बाब भगवान मेंढे यांना सांगितली. छाया जुंबळे आणि चैनलाल सोनवणे यांनी सकाळी सुनीताचा चेहरा आणि गळ्यावर नखांचे घाव दिसल्याचे आणि त्यांनी त्याचे फोटोही घेतले असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांत तक्रार दिल्यानंतर घडला प्रकार समोर आला.
हेदेखील वाचा : दीपिका-रणवीरच्या मुलीला पाहण्यासाठी मुकेश अंबानी हॉस्पिटलमध्ये पोहोचले, बाळाला भेटून दिला आशीर्वाद!