
ट्रकचालकाने वृद्धेला चिरडले
नागपूर : सिग्नलवर उभ्या असलेल्या दुचाकीला ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत मागे बसलेली वृद्ध महिला दुचाकीवरून खाली पडताच ट्रकने तिला चिरडले. अपघाताची ही भीषण घटना सोमवारी रात्री नरेंद्रनगर चौकात घडली. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. या अपघातानंतर आरोपी ट्रकचालक घटनास्थळाहून पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिस आणि बेलतरोडी ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. मात्र, महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता.
उज्ज्वला सुनील बैतुले (वय ६२, रा. वालकर रोड, महाल) असे मृत वृद्धेचे नाव आहे. सायंकाळी त्या मैत्रीण स्नेहा मुंजे (वय ५२) यांच्यासोबत इंद्रप्रस्थनगरातील मैत्रिणीच्या घरी आयोजित कार्यक्रमात गेल्या होत्या. रात्री आठ वाजताच्या सुमारास दोघीही क्रमांकाच्या दुचाकीने (एमएच-४९/एएक्स-६७७६) घरी परतत होत्या. गाडी स्नेहा चालवत होत्या, तर उज्ज्वला मागे बसल्या होत्या. नरेंद्रनगर चौकातून सुयोगनगरकडे जाणारे सर्व वाहन सिग्नलवर थांबले होते.
दरम्यान, सिग्नल हिरवा होताच स्नेहाच्या गाडीमागे उभ्या एमएच-४०/एके-५३३९ च्या क्रमांकाच्या ट्रकचालकाने त्यांना मागून जबर धडक दिली. तोल गेल्याने स्नेहा पाठीच्या भारावर खाली पडल्या आणि ट्रकच्या पुढच्या चाकाखाली आल्या. त्यानंतरही चालकाने वाहन न थांबवल्याने त्या ट्रकच्या मागच्या चाकातही आल्या. मात्र, या अपघातात उज्ज्वला सुनील बैतुले या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.
ट्रॅव्हल्सच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
ट्रॅव्हल्सचालकाने निष्काळजीपणे व भरधाव वाहन चालवून दुचाकी आणि सायकलस्वाराला जबर धडक दिली. यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला, तर सायकलस्वार जखमी आहे. अपघाताची ही घटना नवीन कामठी पोलिस ठाण्यांतर्गत घडली. जुनैद अजीज गोरेपठाण (वय २०, रा. तंबाखू ओळ, कामठी) असे मृताचे नाव आहे.
जयपूरमध्ये अपघात
दुसऱ्या एका घटनेत, जयपूरमध्ये अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू तर १६ जण जखमी झाले आहे. एका भरधाव वेगाने येणाऱ्या ऑडी कारचे नियंत्रण सुटले आणि ती प्रथम डिव्हायडरवर आदळली आणि नंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या पादचाऱ्यांना आणि खाद्यपदार्थांच्या दुकानांना धडकली. ही घटना जर्नलिस्ट कॉलनीमध्ये खरबास सर्कलजवळ घडल्याचे समोर आले आहे.
हेदेखील वाचा : Jaipur Accident: जयपूरमध्ये भरधाव ऑडीचा कहर; डिव्हायडरला धडकून पादचाऱ्यांवर घुसली कार, एकाचा मृत्यू, 16 जखमी