लघुशंका करताना हटकल्याचा राग; टोळक्याच्या मारहाणीत सुरक्षा रक्षकाच्या पत्नीचा मृत्यू
पुणे : पुण्यातील थेऊर भागात उघड्यावर लघुशंका करताना सुरक्षा रक्षकाने हटकले. याचा राग आल्यामुळे टोळक्याने हवेत गोळीबार करत सुरक्षा रक्षकासह त्यांच्या पत्नीला मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचार सुरू असताना दुर्दैवी मृत्यू झाला. याघटनेने लोणी काळभोर परिसरात बुधवारी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, लोणी काळभोर पोलिसांनी याप्रकरणात तिघांना अटक केली असून, इतरांचा शोध सुरू आहे.
शीतल चव्हाण (वय २९) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी सतीश लोखंडे, अजय मुंढे, भानुदास शेलार या तिघांना अटक केली आहे. याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, यात खूनाचे कलम वाढविण्यात आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पुणे- सोलापूर रस्त्यावरील थेऊर वाघोली रस्त्यावर जमिनीचे प्लॉटिंग सुरू आहे. तिथे अक्षय चव्हाण त्याच्या पत्नीसोबत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. तो राहण्यास देखील त्याच ठिकाणी आहे. शुक्रवारी रात्री एका काळ्या गाडीतून जाणारे टोळके मोकळ्या प्लॉटजवळ थांबले. गाडीतून तिघे उतरले. त्यांनी तेथील मोकळी जागा असल्याने लघुशंका केली. त्यावेळी अक्षयने त्यांना हटकले. त्यांना येथे लघुशंका करण्यास विरोध केला. त्याचा राग आल्यानंतर तिघांनी अक्षयशी बाचाबाची केली.
हे सुद्धा वाचा : पुणे हादरलं! लोखंडी रॉड अन् दगडाने ठेचून मुलाचा खून; कारणही आलं समोर
घटनेनंतर आरोपींनी काढला पळ
गोंधळ सुरू झाल्याने अक्षयची पत्नी शीतल देखील त्याठिकाणी आली. तेव्हा अजय मुंढेने त्याच्याजवळील पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. तर त्यांनी दोघांवर दगडफेक केली. दगडफेकीत दगड लागल्याने अक्षयची पत्नी शीतल जखमी झाली. घटनेनंतर आरोपींनी तिथून पळ काढला. शीतल या गंभीर जखमी झाल्याने त्यांना लोणी काळभोर येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना बुधवारी त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर लोणी काळभोर तसेच थेऊर भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रुग्णालयाच्या परिसरात मोठा जमाव देखील जमा झाला होता. दरम्यान, पोलिसांनी तिघांना अटक केली असून, त्यांच्याकडून पिस्तुल, काडतुसे व फॉर्च्युनर गाडी जप्त केली आहे.
दोन तरुणांवर कोयत्याने वार
पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली भरदुपारी कर्वे रस्त्यावरील प्रसिद्ध महाविद्यालय परिसरात फिल्मीस्टाईल टोळक्याने हातात कोयते घेऊन पाठलाग करत दोन तरुणांवर कोयत्याने वार केले. यात एका तरुणाची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर, दुसऱ्याला डोक्यात वार करून जखमी केले आहे. भरदुपारी घडलेल्या याघटनेमुळे महाविद्यालय परिसरात चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. धक्कादायक म्हणजे, मैत्रिणीबद्दल अफवा पसरवतोय या संशयावरून टोळक्याने वार केले आहेत. घटनेची माहिती मिळताच परिमंडळ एकचे उपायुक्त संदिपसिंह गिल्ल व डेक्कन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमी असलेल्या तरुणांकडे चौकशी केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.