संग्रहित फोटो
पुणे : नगर रस्त्यावरील वाघोली भागात वाघेश्वरनगर येथे एका अल्पवयीन मुलाचा लोखंडी रॉड तसेच दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीला बोलत असल्याच्या रागातून हा खून झाल्याचे सांगण्यात आले आहे. प्रेमप्रकरणातून खून झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
गणेश वाघू तांडे (१७) असे हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मण पेटकर (वय ६०), नितीन पेटकर (वय ३१) आणि सुधीर पेटकर (वय ३२) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास घडली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, गणेश तांडे याचे कुटूंब व पेटकर कुटूंब एकाच भागात राहण्यास आहेत. गणेश हा पेटकर यांच्या मुलीशी बोलत असल्याचा संशय कुटूंबियांना होता. त्याचा राग आरोपींच्या मनात होता. दरम्यान, मंगळवारी रात्री साडे बाराच्या सुमारास गणेश नेहमीप्रमाणे मित्रासोबत वस्तीत थांबलेला होता. तेव्हा वडिल तसेच त्यांची दोन मुले येथे आली. त्यांनी गणेशला गाठले. तिघांनी गणेशवर लोखंडी रॉड आणि दगडाने हल्ला केला. हल्ला इतका क्रूर होता की, गणेशचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात चांगलाच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच वाघोली पोलिसांनी येथे धाव घेतली. तसेच, तिघांना ताब्यात घेतले. या खूनामुळे मात्र, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
हे सुद्धा वाचा : चोरांना राहिला नाही धाक! घरात घुसून वृद्ध दाम्पत्याला मारहाण केली अन्…
दोन तरुणांवर कोयत्याने वार
गेल्या काही दिवसाखाली भरदुपारी कर्वे रस्त्यावरील प्रसिद्ध महाविद्यालय परिसरात फिल्मीस्टाईल टोळक्याने हातात कोयते घेऊन पाठलाग करत दोन तरुणांवर कोयत्याने वार केले. यात एका तरुणाची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर, दुसऱ्याला डोक्यात वार करून जखमी केले आहे. भरदुपारी घडलेल्या याघटनेमुळे महाविद्यालय परिसरात चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. धक्कादायक म्हणजे, मैत्रिणीबद्दल अफवा पसरवतोय या संशयावरून टोळक्याने वार केले आहेत. घटनेची माहिती मिळताच परिमंडळ एकचे उपायुक्त संदिपसिंह गिल्ल व डेक्कन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमी असलेल्या तरुणांकडे चौकशी केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, पसार झालेल्या तरुणांचा शोध घेतला जात आहे.