भरधाव वेगातील कारची दुचाकीला धडक; अपघातात तरुणाचा मृत्यू
पुणे : पुणे शहरात अपघाताचे सत्र सुरूचं असून, सिंहगड रोड परिसरात वडगाव उड्डाणपुलावर भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला आहे. यासोबतच सहप्रवासी मित्र गंभीर जखमी झाला आहे. कारवरील नियंत्रण सुटल्याने ती थेट उड्डाणपुलावरुन रस्त्यावर कोसळली. कारमधील ‘एअर बॅग’ उघडल्याने सुदैवाने चौघे बचावले. कारमधील तिघांनी मद्यप्राशन केल्याचे उघडकीस आले आहे.
कुणाल मनोज हुशार (वय २३, रा. चिंचवड) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. तर सहप्रवासी मित्र प्रज्योत दीपक पुजारी (वय २३, रा. चिंचवड) हा जखमी झाला आहे. अपघात प्रकरणात चालक शुभम राजेंद्र भाेसले (वय २३, रा. प्राधिकरण, निगडी) याला ताब्यात घेण्यात आले आहे. अपघातात भोसले, त्याचे मित्र निखील मिलिंद रानवडे (वय २६, रा. ओैंध गाव), श्रेयस रामकृष्ण साेळंकी (वय २५, रा. चिंचवड), वेदांत इंद्रसिंग रजपूत (वय २८) हे जखमी झाले आहेत.
आरोपी भोसले व त्याचे मित्र पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. तर मयत कुणाल आणि त्याचा मित्र प्रज्योत महाविद्यालयीन शिक्षण (बीएस्सी काॅप्युटर) घेत आहेत. आरोपी भोसले याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम भोसले याच्या आईच्या नावाने कारची नोंदणी झाली आहे. शुभम शुक्रवारी रात्री कार घेऊन बाहेर पडला. त्याने मित्र निखील, श्रेयस आणि वेदांत यांना बरोबर घेतले. चौघे जण रात्री उशीरा हिंजवडी भागातील एका ढाब्यावर जेवण करण्यासाठी गेले होते. तेथे त्यांनी मद्यपान केले. जेवण केल्यानंतर शुभम मित्रांना घेऊन मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गाने खेड शिवापूरला गेला. खेड शिवापूरहून मोटारचालक शुभम हा मित्रांसोबत पुन्हा भरधाव वेगात निगडीकडे निघाला होता.
बाह्यवळण मार्गावरील वडगाव उड्डाणपुलावर पहाटे साडेतीनच्या सुमारास मोटारचालक शुभमचे नियंत्रण सुटले. दुचाकीस्वार कुणाल आणि त्याचा मित्र प्रज्योत हे बाह्यवळण मार्गाने चिंचवडकडे निघाले होते. भरधाव मोटारीने पाठीमागून दुचाकीला धडक दिली. अपघातात कुणालच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तसेच त्याच्याबरोबर असलेला मित्र प्रज्योत गंभीर जखमी झाला.