पुण्यात कोयत्याने वार करुन तरुणाचा खून, हाताची बोटेही तोडली; कारण...
पुणे : राज्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून, पुण्यातून आता एक मोठी बातमी समोर आली आहे. पानटपरीवर झालेल्या किरकोळ वादातून तरुणावर कोयत्याने वार करून त्याचा खून केल्याची घटना कात्रज भागात घडली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एकाला अटक केली आहे. आर्यन साळवे (वय २५, रा. सटाणा, नाशिक) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी धैर्यशील मोरे (वय ३०, रा. साई सिध्दी चौक) याला अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आर्यन मूळचा नाशिक जिल्ह्यातील आहे. त्याचे मामा धनकवडीत राहतात. १५ दिवसांपूर्वी तो मामाकडे राहण्यास आला होता. तो एका केशकर्तनालयात काम करत होता. शुक्रवारी (११ जुलै) रात्री साडेदहाच्या सुमारास साई सिद्धी चौकातील पानपट्टीवर पान खाण्यासाठी गेला होता. त्यावेळी आरोपी धैर्यशील येथे सिगारेट ओढत होता. धैर्यशीलने आर्यनकडे पाहिले. यावरून त्यांच्यात वाद झाला. वादातून धैर्यशीलने कोयत्याने आर्यनवर वार केले. आर्यनने कोयत्याचा वार हातावर घेतला. त्याची बोटे तुटली. त्याच्या डोक्यावर कोयत्याने वार केला. या घटनेत आर्यन गंभीर जखमी झाला. नंतर त्याला नागरिकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे यांनी दिली. पोलिसांनी धैर्यशीलला अटक केली असून, पोलीस उपनिरीक्षक प्रियंका निकम तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : ‘स्मार्ट’ चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; तपासातून धक्कादायक प्रकार उघड
कोंढव्यात तरुणावर कोयत्याने वार
कोंढव्यात जुन्या वादातून नऊ जणांच्या टोळक्याने हातात कोयते तसेच तलवारी घेऊन दहशत माजवत एका तरुणावर वार करून त्याच्या खूनाचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. या तरुणांनी तीन दुचाकीवर ट्रिपलशीट फिरत परिसरात प्रचंड गोंधळ माजवून व तलवारी हवेत फिरवून मध्यरात्री दहशत माजवली. अचानक झालेल्या या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. याघटनेत ओंकार सुदाम साबळे (वय २५, रा. कोंढवा) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, काही आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती देण्यात आली आहे.
एकाला बेदम मारहाण करुन खुनाचा प्रयत्न
पुण्यातील वाकडेवाडी परिसरातील महापालिका वसाहतीत घरासमोर पाणी सांडल्याने झालेल्या वादातून एकाला गजाने बेदम मारहाण करुन खुनाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांवर गु्न्हा दाखल केला आहे. मुकेश धोबी (वय ३४, रा. म्हसोबा मंदिरासमोर, पीएमसी काॅलनी, वाकडेवाडी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी शंकर खांडेकर, भिकाजी खांडेकर, मुस्कान खांडेकर (तिघे रा. पीएमसी काॅलनी, वाकडेवाडी), तसेच अली इराणी यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत धोबी यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.