
'मला तुझ्याशी लग्न करायचंय' असं म्हणत तरुणाची तरुणीला मारहाण; जीवे मारण्याची धमकीही दिली
सातारा : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यांसारख्या घटना घडत आहेत. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहेत. असे असताना आता सातारा शहरातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाची जबरदस्ती, मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी संबंधित तरुणावर पोक्सोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ डिसेंबर रोजी दुपारी सव्वातीन वाजता ही अल्पवयीन मुलगी खासगी क्लासला जात असताना संबंधित युवकाने तिचा पाठलाग केला. त्याने ‘मी स्वतःचा जीव देईन’ अशा धमक्या देत तिला जबरदस्तीने गाडीत बसवले व अजिंक्यतारा किल्ल्यावर नेले. तेथे त्याने ‘मला तुझ्याशी लग्न करायचे आहे’ असे सांगत मुलीला हाताने मारहाण केली.
याशिवाय, ‘आत्ताच लग्न केले नाही तर येथेच जीवे मारून टाकीन’ अशी धमकीही दिली. नंतर त्या युवकाने तिला तिच्या घरी आणून मुलीच्या कुटुंबीयांकडे १० हजार रुपयांची मागणी केली. ‘तुमच्या मुलीचे नाव मी छातीवर गोंदले आहे, ते काढायचे आहे’ असे सांगून पैशासाठी दबाव टाकला. तसेच मुलीने त्याच्याशी लग्न करण्यास सहमती दर्शविल्याचे व्हिडिओ स्वतःकडे असल्याचा दावा करून कुटुंबीयांना धमकावले.
हेदेखील वाचा : Jalgaon Crime: इंस्टाग्राम व्हिडिओचा वाद ठरला जीवघेणा! जळगावात 19 वर्षीय तरुणाची बेदम मारहाणीत हत्या; ८ जणांविरोधात गुन्हा दाखल
दरम्यान, या सर्व प्रकरणाची माहिती मिळताच मुलीच्या आईने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपी युवकाविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार तसेच विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबतचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.
पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून मारहाण
पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप करुन तिघांनी एका तरुणावर शस्त्राने वार केल्याची घटना कात्रज भागात घडली आहे. या प्रकारानंतर आरोपींनी दहशत माजवून ट्रकची काचदेखील फोडली आहे. याप्रकरणी भारती विद्यापठ पोलिसांकडून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २६ वर्षीय तरुणाने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
हेदेखील वाचा : Nashik Crime: कुख्यात लोंढे टोळीचा भूषण लोंढेला नेपाळ बॉर्डरवरून अटक; पोलिसांचा सुगावा लागताच ३४ फुटांवर मारली उडी