इचलकरंजी हादरली! तरुणाचा ट्रॅक्टरच्या चाकाखाली ढकलून खून; नेमकं काय घडलं?
इचलकरंजी : जुन्या वादातून झालेल्या हाणामारीत तरुणाला ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या चाकाखाली ढकलून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गावभाग पोलिसांनी तिन तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे. विशाल आप्पासो लोकरे (वय २९ रा. संतमळा) असे मयत तरुणाचे नाव असून सागर मोहन वाघमारे (वय २९), यश अरुण चौगुले (वय २६) व संतोष मनोळे (वय २६ सर्व रा. इचलकरंजी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी मयताचा भाऊ निलेश आप्पासो लोकरे यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिस व घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास विशाल लोकरे हा त्याचा मित्र अनिकेत सुनिल तोडकर (वय २०) याच्यासोबत विकली मार्केट परिसरातील समता वाईन शॉप याठिकाणी पार्सल नेण्यासाठी आला होता. त्याचवेळी त्याठिकाणी आलेल्या सागर वाघमारे याने विशाल याच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद त्याठिकाणी असलेल्या आकाश जगदाळेे, अरुण चव्हाण व महेश सुतार यांनी सोडविण्याचा प्रयत्न केला. त्याचदरम्यान सागर याच्यासोबत यश चौगुले व संतोष मनोळे अशा तिघांनी मिळून विशाल याला धक्काबुक्की करत जीवे मारण्याच्या उद्देशाने रस्त्यावरुन निघालेल्या ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या शेवटच्या चाकाखाली ढकलून दिले.
दरम्यान त्यामध्ये विशाल याच्या डोक्याला, पोटाला व मांडीला गंभीर स्वरुपाची दुखापत झाली. त्याला तातडीने त्याच्या मित्रांनी व नागरिकांनी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले. परंतु त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला रात्रीच्या सुमारास सांगली सिव्हील हॉस्पिटलमद्ये दाखल केले. त्याठिकाणी उपचार सुरु असताना मध्यरात्रीच्या सुमारास विशाल याचा मृत्यू झाला. सांगली सिव्हील रुग्णालयात उपचार सुरु असताना विशाल याचा मृत्यू झाला. त्याचठिकाणी शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. विशाल याचे पार्थिव शनिवारी सकाळी घरात आणण्यात आले.
हे सुद्धा वाचा : मुंबईत सेलिब्रिटी अन् गावात सरपंच सुरक्षित नाहीत, तर…; नाना पटोलेंचा सवाल
दगडाने ठेचून मुलाचा खून
दरम्यान गेल्या काही दिवसाखाली नगर रस्त्यावरील वाघोली भागात वाघेश्वरनगर येथे एका अल्पवयीन मुलाचा लोखंडी रॉड तसेच दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीला बोलत असल्याच्या रागातून हा खून झाल्याचे सांगण्यात आले आहे. प्रेमप्रकरणातून खून झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. गणेश वाघू तांडे (१७) असे हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मण पेटकर (वय ६०), नितीन पेटकर (वय ३१) आणि सुधीर पेटकर (वय ३२) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास घडली आहे.