जुन्या वैमनस्यातून तरुणाची हत्या; आरोपी अटकेत
नागपूर : पूर्ववैमनस्यातून एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. ही थरारक घटना वाठोडा पोलिस ठाण्यांतर्गत रात्रीच्या सुमारास घडली. अभिषेक राजकुमार पिंपळीकर (वय २५, रा. सूरजनगर, भांडेवाडी) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून मृताच्या वस्तीतच राहणारा आरोपी प्रकाश संतोष गायकवाड (वय २३) याला अटक केली आहे.
अभिषेक हा कचरा संकलन करणाऱ्या वाहनावर चालक होता. प्रकाश हा कचऱ्यातून प्लॅस्टिक आणि भंगार गोळा करून विकतो. यातून मिळालेल्या पैशांवर त्याचा उदरनिर्वाह चालतो. पूर्वी अभिषेक आणि प्रकाश सोबत मिळून हे काम करत होते. या दरम्यान पैशांवरून त्यांच्यात वाद झाला होता. तेव्हापासून त्यांच्यात वैमनस्य होते. रविवारी अभिषेकच्या वडिलांची श्राद्ध पूजा होती. त्यामुळे दिवसभर तो घरीच होता. सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास त्याने आईला बाहेरून फिरून येतो असे सांगितले आणि घरून निघाला.
दरम्यान, काही वेळानंतर आईने फोन केला असता जवळच मित्रांसोबत गप्पागोष्टी करत असल्याची माहिती दिली. रात्री पावणेदहाच्या सुमारास घराजवळच अभिषेक आणि प्रकाश यांच्यात पुन्हा भांडण झाले. या दरम्यान प्रकाशने चाकू काढत अभिषेकवर हल्ला केला. सपासप वार करून रक्ताच्या थारोळ्यात लोळवले.
अभिषेकच्या आईला तातडीने निरोप
स्थानिक नागरिकांनी अभिषेकची आई मीना पिंपळीकर यांना घटनेची माहिती दिली. तत्काळ मित्र त्याला वाहनात टाकून मेडिकल रुग्णालयात घेऊन गेले. तेथे उपचारादरम्यान अभिषेकचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वाठोडाचे ठाणेदार हरीश बोराडे आणि डीबी पथक घटनास्थळी पोहोचले. अर्ध्यातासात पोलिसांनी प्रकाशला शोधून अटक केली.
न्यायालयाने सुनावली पोलिस कोठडी
सोमवारी दुपारी प्रकाशला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तरुण मुलगा गेल्याने मीना यांना मोठा धक्का बसला आहे. मीना लोकांच्या घरी स्वयंपाक बनवण्याचे काम करतात. पतीच्या मृत्यूनंतर अभिषेकच त्यांचा आधार होता. त्यांना प्रकाशसोबत असलेल्या त्याच्या वादाबाबत कोणतीही माहिती नव्हती.