सासवड पोलीस ठाण्यात बेवारस दुचाकी वाहने पडून; तब्बल 'इतक्या' वाहनांचे होणार लिलाव
सासवड : सासवड पोलीस ठाण्यामध्ये विविध घडलेल्या घटनांमध्ये अनेक दुचाकी पडून आहेत. अशी वाहने संबंधित मूळ मालकांनी नेण्यासाठी पोलीस ठाण्याच्या वतीने पूर्ण प्रयत्न केले जात असून, अनेक वाहने मालकांनी स्वतःहून नेली आहेत. त्याचप्रमाणे अनेक मालकांना शोधून वाहने नेण्यासाठी अनेकवेळा विनंती केली. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद आला नाही. त्यामुळे अशा बेवारस वाहनांचा लवकरच लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली आहे.
अपघात, चोरी आणि इतर घटनांमध्ये अनेक दुचाकी सासवड पोलीस ठण्यात आल्यानंतर त्या वर्षानुवर्षे पोलीस ठाण्याच्या आवारात तशाच पडून आहेत. त्यामुळे इतर वाहने पार्किंग करताना अनेक अडचणी येत आहेत. म्हणून वर्षानुवर्षे पडून राहिल्याने वाहने भंगारात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, यातील अनेक वाहने सुस्थितीत असल्याने त्यांचा दैनंदिन वाहतुकीसाठी उपयोग करणे शक्य आहे. म्हणून अशा वाहनांचा लिलाव करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सासवड पोलीस ठाण्यात लावण्यात आलेल्या वाहनांपैकी अनेक वाहने संबंधित मालकांना शोधून देण्यात आलेल्या आहेत. अद्याप सुमारे ९७ दुचाकी गाड्या बेवारस स्थितीत पडून राहिल्या आहेत. याबाबत परिवहन विभागाकडून माहिती घेऊन संबंधित मालक शोधून त्यांना पत्र व्यवहारही केला. मात्र, अद्याप प्रतिसाद मिळाला नाही. यामध्ये हिरोहोंडा, कावासाकी, बुलेट सुझुकी, स्प्लेंडर, बजाज डिस्कव्हर, बॉक्सर, पॅशन, सीडी डिलक्स, होंडा शाईन, अशा विविध प्रकारच्या गाड्यांचा समावेश आहे. अशी माहिती सहायक महिला पोलीस फौजदार संगीता राणे यांनी दिली.
राज्य शासनाच्या १०० दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रम अंतर्गत सासवड पोलीस ठाण्यातील सर्व दप्तर अद्ययावत करण्यात येत आहे. मागील पंधरवड्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देवून वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेतला आहे. त्याच बरोबर जनता आणि प्रशासन यांच्यात समन्वय वाढविणे, गुन्हेगारी कमी करणे, बेकायदा व्यवसायांना आळा घालणे, गुन्हे उघडकीस आणून गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येत आहे. यामधीलच एक मोहीम म्हणजे अनेक वर्षे पडून असलेल्या गाड्यांच्या मालकांचा शोध घेवून त्यांना देण्यात येणार आहेत तसेच कोणी तयार नसल्यास त्यांचा लिलाव करण्यात येईल. असे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी सांगितले.