Bharti University Police Station crime news
पुणे : पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. शहरी भागामध्ये महिला सुरक्षित नसल्याचे मागील अनेक गुन्ह्यांवरुन लक्षात येत आहे. यामध्ये आता महिलेला घरामध्ये घुसून धमकी दिल्याचा प्रकार पुण्यामध्ये घडला आहे. कॉलेजची फी रोख स्वरूपात घ्यावी यासाठी ट्रस्टींनी फायनान्स मॅनेजर असलेल्या महिलेच्या घरात घुसून तिला धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आमचे म्हणणे ऐकले नाही तर त्याचे काय परिणाम होतील ते भोगण्यासाठी तयार रहा. तुला कामावरुन काढून टाकू, अशी धमकीही दिल्याचे तक्रारीत सांगण्यात आले आहे.
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यातील ३२ वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी युनिय बिबलीकल सेमीनारी सोसायटीचे मुख्य ट्रस्टी डॉ. सुभाष डोंगरदिवे (वय 61 वर्षे) आणि डेव्हिड हटारिया (वय 63 वर्षे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार बिबवेवाडी येथील युनियन बिबलीक सेमीनारी सोसायटीच्या कॉलेजचा सर्व व्यवहार पाहतात. विद्यार्थ्यांकडून चेक किंवा ऑनलाईन स्वरुपात जमा होणारी फी मधून कॉलेजच्या सर्व व्यवस्थापनाची मंजुरी घेऊन ज्या त्या विभागाचा खर्च देत असतात. जून २०२४ मध्ये कॉलेजचे मुख्य ट्रस्टी डॉ. सुभाष डोंगरदिवे हे त्यांच्या ऑफिसमध्ये आले. विद्यार्थ्यांकडून जमा होणारी सर्व फी चेक किंवा ऑनलाईन स्वरुपात न घेता ती आता रोख स्वरुपात घ्या. जमा झालेली रोख रक्कम यापुढे आम्हाला द्या असे सांगितले. तेव्हा तक्रारदारांनी त्यांना विद्यार्थ्यांकडून रोख स्वरुपात फी घेता येणार नाही. ते शासनाच्या नियमावलीच्या विरुद्ध आहे, असे सांगितले. त्यावर ते चिडून निघून गेले. तक्रारदार घरी असताना १० जून २०२४ रोजी सायंकाळी डॉ. डोंगरदिवे व डेव्हिड हटारिया हे बेधडक घरात शिरले. त्यांनी तक्रारदारांना धमकावून तू आमच्यासाठी कॉलेजची फी रोख स्वरुपात घे व तु आमची टीम जॉइन्ट कर, तू आमच्या म्हणण्याप्रमाणे काम कर, तू आमच्या म्हणण्याप्रमाणे काम केले तर, तुझा पगार वाढवू शिवाय तुला प्रमोशन देऊ. तु आमचे म्हणणे ऐकले नाही तर त्याचे काय परिणाम होतील ते भोगण्यासाठी तयार रहा. नाही तर आम्ही तुला कामावरुन काढून टाकू, अशी धमकी दिली व ते घरातून निघून गेले, असे तक्रारीत म्हटले आहे. आपली नोकरी जाईल या भितीपोटी घाबरुन त्यांनी हे कोणासही सांगितले नाही. या दडपणामुळे त्या आजारी पडल्या. पती व इतरांनी धीर दिल्यानंतर त्यांनी तक्रार दिली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक कोळी करीत आहेत.