अहिल्यानगर : जेव्हा रक्षकच भक्षक बनतात तेव्हा सामान्य जनतेने आपल्या समस्यांसाठी न्याय मागायचा तरी कोणाकडे! अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलिस प्रशासनात एकीकडे काही कर्मचारी इमानदारीने आपले कर्तव्य बजावत असताना मात्र प्रशासनातील काही कर्मचारी मात्र सामान्य जनतेला खोट्या गुन्ह्याची भीती घालून कोटींची खंडणी वसूल करण्यात मग्न आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात देखील असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नगर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांचा नवा पराक्रम सद्या जिल्हाभर चांगलाच चर्चिला जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईंची जितकी चर्चा होत नाही त्यापेक्षाही जास्त चर्चा त्यांचाच कर्मचाऱ्यांनी केलेल्या गुन्ह्याची झाली आहे.
एका आरोपीला आणखी खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन आरोपीकडूनच कोटींची खंडणी वसूल केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या ४ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी प्रसिद्धी पत्रक काढत स्थानिक गुन्हे शाखेच्या चारही कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
याबाबत मिळालेली अधिकची माहिती अशी की, शिर्डी येथील ग्रो मोअर इन्व्हेसमेन्ट फायन्सास कंपनी या कंपनीचे संचालक व इतरांनी चांगला परतावा देतो असे अमीष दाखवुन व फिर्यादीचा विश्वास संपादन करुन फिर्यादीची एकुण ८ लाख रुपयांची फसवणुक करुन ते पसार झाले आहे, वगैरे मजकुरचे फिर्यादीवरुन राहाता पो. स्टे. गु. र. नं. २७३/२०२५ वी. एन. एस. २०२३ चे कलम ३१८ (२). ३१८ (४), ३१६(२), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. त्याचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.
सदर गुन्हयाचा तपासात आरोपी नामे भुपेंद्र राजाराम सावळे, वय २७ वर्षे, रा. नांदुखीं रोड, साईभक्ती भुषण निवास, श्रीकृष्णनगर, शिर्डी ता. राहाता जि. अहिल्यानगर याचेकडे सदर तपासाचे अनुषंगाने चौकशी केली असता. त्याने शेअर मार्केटच्या चढ उतारामध्ये मोठ्या प्रमाणात घाटा झाल्यामुळे गुंतवणुकदारांचे पैसे वापस करु शकलो नाही. त्याच्या कडील जनतेच्या ठेवी व परतावाबाबत माहिती विचारली असता त्याने सांगितले की,दि १५/०१/२०२५ रोजी मला स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई धाकराव व त्याच्या सोबतच्या तीन पोलीस कर्मचारी यांनी मी, माझे दोन भाऊ व मित्र असे नाशिककडे फॉर्च्यूनर गाडीने जात होतो.
लोणी जवळअडवून हे पोलीस म्हणाले, तुझ्याकडे कोणतेही आरबीआय चे लायसन्स नसतांना जनतेकडुन पैसे गोळा करून त्यांची फसवणूक करतो म्हणून तुझ्यावर गुन्हा दाखल करतो. मी त्यांना माझ्यावर कोणती ही कार्यवाही करु नका मी कोणाची ही फसवणूक केलेली नाही, मला विनाकारण कोणत्याही खोटया गुन्हयात अडकवू नका, त्यावर ते व त्यांचे सोबतचे कर्मचारी मला म्हणाले तुला जर यातुन सुटायचे असेल तर तु आंम्हाला १ कोटी ५० लाख रुपये नगद स्वरुपात दे. त्यावर मी धाकराव साहेब व सोबतच्या कर्मचारी यांना माझ्याकडे नगद स्वरुपात पैसे नाहीत, मी नगद पैसे देवु शकत नाही असे म्हणालो. त्यांनतर धाकराव साहेब व सोबतच्या पोलीसांनी मला व माझे सोबतचे माझे २ भाऊ व मित्र यांना अहिल्यानगर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाचे आवारातील पार्कीगमध्ये घेवून आले.
तेथे थांबल्यावर धाकराव साहेबांनी मला ऑनलाईन १ कोटी ५० लाख रुपये दया असे सांगितले. त्यावर विनाकारण एखादया खोटया गुन्हयात अडकण्यापेक्षा पोसई धाकराव साहेंबांनी सांगीतले प्रमाणे, त्यांनी दिलेल्या अकाउंटवर मी ऑनलाईन १ कोटी ५० लाख रुपये ट्रान्सफर केले आहे अशी आरोपीने माहिती दिली असता, त्या बाबत सदर तपासादरम्यान चौकशी केली असता पोसई धाकराव व त्यांचे सोबतचे तीन पोलीस अंमलदार यांनी सदर गैरकृत्य केल्याचे सकृतदर्शनी दिसुन आले आहे.
सदर बाबत तपास अधिकारी यांनी दिलेल्या अहवालावरुन आज दिनांक २१जुलै रोजी पो.स.ई. तुषार छबुराव धाकराव, व पोलीस अंमलदार मनोहर सिताराम गोसावी, २) बापुसाहेब रावसाहेब फोलाणे, ३) गणेश प्रभाकर भिंगारदे सर्व स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना शासन सेवेतून निलंबीत करण्यात आले
यापूर्वीही स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांवर विविध आरोप –
यापूर्वीही अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या शाखेतील काही कर्मचाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप झाले होते. श्रीगोंदा मतदार संघाचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी यंदाच्या पावसाळी अधिवेशनात देखील स्थानिक गुन्हे शाखेच्या कारभारावर कारभारावर ताशेरे ओढत येथील एका कर्मचाऱ्याच्या पराक्रमाचा पाढाच वाचून दाखवला होता. आज माध्यमांशी बोलताना पाचपुते यांनी सांगितले की, पोलिस खात्याचे काम रक्षण करणं आहे. जेव्हा रक्षकच भक्षक होतो हे चित्र जेव्हा समाजात तयार झाले तर अडचणीचे होऊ शकते. तसे चित्र होऊ नये यासाठी काम केले पाहिजे. जिल्ह्याला घार्गे यांच्या रूपाने चांगले अधिकारी मिळाले आहेत. एक काळ नगरमध्ये लोकं तक्रारी करण्यासाठी पुढे येत नव्हते आता लोकं पुढं येत आहेत. एखादी गोष्ट अधिक काळ तशीच असेल तर त्याला पर्याय पाहणे गरजेचे असते, त्यावर नियंत्रण तसे हवे. त्यामुळे पोलिसांकडे जनतेच्या संरक्षणाचे काम आहे त्यांनी संरक्षणच करावे इतर कामे करण्यासाठी बाकी लोकं आहेत असा उपरोधिक टोलाही यावेळी पाचपुते यांनी लगावला आहे.