अलिबाग : पाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि. 26 व 27 मेच्या दरम्यान रात्री मौजे हातोंड बेंदवबाडा व मौजे गोंदवड या ठिकाणी घरांवर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू करून पाली पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्या विरोधात महाराष्ट्र व इतर राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्ह्यांची नोंद असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या दरोड्याप्रकरणी पालीचे पोलीस निरीक्षक भास्कर पळेलकर व त्यांच्या टीमने तातडीने कारवाई करत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास हाती घेतला. जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या देखरेखीखाली पथकाने आठ ते नऊ दिवस अथक परिश्रम घेत गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेतला आणि अखेर गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींना अटक करण्यात यश आले.
अटक करण्यात आलेले आरोपीमध्ये अजय एकनाथ चव्हाण, आकाश पंजाबराव चव्हाण, सुनिल प्रकाश चव्हाण, मल्हारी भानुदास चव्हाण, सोमनाथ भानुदास चव्हाण,सुजल महेश चव्हाण, या आपोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान आरोपींची पार्श्वभूमी तपासली असता, त्यांच्या विरोधात रायगड, पुणे, मुंबई, ठाणे व नाशिक या ठिकाणच्या पोलीस ठाण्यांमध्ये विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे. विशेषतः अजय चव्हाण याच्यावर एकट्यावरच खालापूर, पेण, जुन्नर, कल्याण, चांदवली नाशिक, पुणे, मुंबई आदी ठिकाणी तब्बल १७ पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद आहे.
या आरोपींनी पूर्वी ठाणे ग्रामीण भागात, मुर्सळ आणि टेकेवाडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतही अशा प्रकारे दरोडा टाकल्याचे निष्पन्न झाले आहे. याशिवाय, इतर जिल्ह्यांतही त्यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून, आरोपी चोरीच्या मालाची विक्री करत असल्याचे निदर्शनास आले आहे.
या प्रकरणातील अधिक तपास सुरू असून, अजून काही आरोपींचा शोध घेणे बाकी आहे. दरोड्यात वापरण्यात आलेली वाहने, साधने व चोरीचा माल जप्त करण्यासाठी पुढील कार्यवाही सुरू आहे.
पोलीस दलाचे विशेष कौतुक
या संपूर्ण कारवाईसाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विशेष मेहनत घेतली. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस नाईक व शिपाई यांच्या समवेत एकूण २० हून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. पथकातल्या प्रत्येक सदस्याचे पोलीस अधीक्षकांकडून कौतुक करण्यात आले आहे.