संग्रहित फोटो
पुणे : पुण्यात गुन्हेगारीसंदर्भातल्या घटना वाढत आहेत. दररोज खून, मारामाऱ्या, दरोडे, लुटमार यासारख्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते तसेच माजी नगरसेवक गोपाळ तिवारी यांच्यासह पाच जणांवर विश्रामबाग पोलिसांनी खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. बोर्ड लावल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणातून हा प्रकार घडला असून, दोघांनी दिलेल्या तक्रारीनुसार परस्पर विरोधी गुन्हे पोलिसांनी दाखल केले आहेत. नारायण पेठेतील केळकर रस्त्यावर तिवारी यांचे मुरलीधर व्हेज हे हॉटेल आहे. त्यापासून जवळच असलेल्या निघोजकर मंगल कार्यालयाजवळ मंगळवारी (दि ५) रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.
स्वप्नील रामचंद्र मोरे (वय ३४,रा. नारायणपेठ) यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गोपाळ शंकर तिवारी (वय ६६, रा. घोलेरोड शिवाजीनगर), हर्ष उर्फ नन्नु शंकर शिर्के (वय २९, रा.नारायपेठ), निखील दिपील जगताप (वय ३३, रा.शनिवारपेठ), मुकूंद शंकर शिर्के (वय २७, रा.नारायणपेठ), अभिषेक उमेश थोरात (वय २२, रा.दत्तवाडी) यांच्यावर खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील हर्ष,निखील, मुकूंद आणि अभिषेक या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, स्वप्नील मोरे यांच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मुरलीधर हॉटेलच्या जवळील पुजा पेंटरच्या समोर सार्वजनिक रोडवर एक काळ्या रंगाचा बोर्ड लावला होता. तो काढण्यासाठी तिवारी आणि त्यांचे साथीदार तेथे आले. ते बोर्ड काढताना मोरे यांनी त्यांना तो काढू नका. तो बेकायदेशीर असल्यास महापालिका काढून घेईल असे म्हटले. त्यावेळी हर्षने मोरे यांना तु कोण मला सांगणार असे म्हणत झटापट करून छातीत बुक्क्या मारल्या. हा प्रकार घडल्यानंतर मोरे यांनी पोलिस चौकीत तक्रार दिली. पोलिसांनी वैद्यकीय तपासणीची यादी देऊन त्यांना ससून रुग्णालयात जाण्यास सांगितले होते. मात्र मोरे नंतर पोलिस चौकीत आले नाहीत असे वरिष्ठ निरीक्षक संतोष पांढरे यांनी सांगितले.
मुकूंद शंकर शिर्के (वय २७, रा.नारायणपेठ) यांच्या तक्रारीनुसार, विश्रामबाग पोलिसांनी स्वप्निल उर्फ बाबा मोरे आणि त्याच्या पाच ते सात साथीदारांविरुद्ध मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
फलटणमधील संतापजनक प्रकार
फलटण शहरातील उपनगरात राहत असलेल्या एका केवळ ९ वर्षाच्या चिमुरडीला तिच्या सख्ख्या मामाने अमानुषपणे मारहाण केली असून, या मारहाणीमुळे संबंधित चिमुरडीच्या मनावर आघात झाला आहे. घडलेला मारहाणीचा प्रकार चिमुरडीने तिच्या वडिलांना सांगितल्यानंतर ही घटना समोर आली आहे. दरम्यान, मामाच्या विरोधात चिमुरडीचे पिता फलटण शहर पोलिस ठाण्यात गेले असता शहर पोलिसांनी अक्षरश: त्यांना हाकलून लावले. शेवटी हतबल झालेल्या पित्याने सातारा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्याकडे धाव घेवून तक्रार मांडली आहे.