
'मरायच्या आधी सर्वांच्या मनातून...'; इन्स्टा स्टोरी ठेवत 18 वर्षीय तरुणाने संपवलं जिवन
योगेश अशोक ख्यागे (वय १८ रा. सुशीलनगर) असे मयताचे नाव आहे. त्याचे आई- वडील विवाहित मुलीला भेटण्याकरिता इंडी (कर्नाटक) येथे गेले होते. त्यामुळे तो घरात एकटाच होता. सकाळी नऊ वाजतापूर्वी त्याने घरातील छताच्या पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला होता. याची माहिती मिळाल्यानंतर रवी प्यागे (चुलत भाऊ) यांच्यासह अन्य नातेवाईकांनी दरवाजा उघडून पाहिले असता तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्याला फासातून सोडवून शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मयत योगेश प्यागे याच्या पश्चात आई, वडील आणि एक विवाहित बहीण असा परिवार आहे. त्याने बारावीपर्यंत शिक्षण घेतले होते. बेकरीत काम करत होता. या घटनेची नोंद विजापूर नाका पोलिसांत झाली असून, आत्महत्येचे कारण समजले नाही. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि मित्रांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी केली होती. परिसरात खळबळ उडाली असून, योगेशच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
योगेशने स्टोरी ठेवत काय म्हटलं?
“मरायच्या आधी सर्वांच्या मनातून उतरून जायचं आहे मला, जेणेकरून मी मेल्यानंतर कोणी माझी आठवण नाही काढली पाहिजे..!!” अशी स्टोरी योगेशने इन्स्टग्रामवर शेअर केली होती.
योगेश एका बेकरी दुकानात काम करत होता, तर त्याचे वडील वॉचमन म्हणून काम करतात. घटनेच्या वेळी योगेशचे आई-वडील नातेवाईकांकडे गेले होते, तर तो घरात एकटाच होता. योगेशने टोकाचे पाऊल का उचलले नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.