मराठी येत नसल्याचा फायदा घेऊन महिलेची फसवणूक, काय आहे प्रकरण?
पुणे : महिलेला मराठी येत नसल्याचा गैरफायदा घेत चार हजार चैारस फुटाचा बनावट दस्त तयार करून तो हडपण्याचा प्रयत्न करून फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महिला मूळची कर्नाटक येथील असून, तिला पत्र व्यवहार करण्यासाठी म्हणून संमतीपत्र घेतो असे सांगत कुलमुखत्यार पत्र घेऊन ही फसवणूक केली.
याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी तुषार हिम्मत कवडे (रा. श्रीनाथनगर, बालाजी मंदीराजवळ, घोरपडी) याला अटक केली आहे. त्याला १७ जानेवारीपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तर या प्रकरणात त्याचे इतर दोन साथीदार पॉल पिटर पलेरो (रा. घोरपडी) आणि सुरेश त्रिंबक पाळवदे (रा थिटेवस्ती, खराडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सलोनी मारिया जॉन डिसुझा (27, रा. सिसिलीया, पिथ्रोडी, कर्नाटक व श्रीनाथनगर घोरपडी गाव) यांनी याबाबत मुंढवा पोलिसांत तक्रार दिली आहे. हा प्रकार २४ एप्रिल ते २ ऑगस्ट २०२४ दरम्यान घडला. याप्रकरणात २२ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
वरिष्ठ निरीक्षक निळकंठ जगताप यांनी सांगितले, सलोनी यांची मौजे घोरपडी येथे एक कोटीपेक्षा जास्त किंमतीची सर्व्हे नंबर ७१, हिस्सा नंबर ४, सीटीएस नंबर 898 यासी क्षेत्र ४ हजार चौरस फुटाचे (चार गुंठे) मालमत्ता आहे. दिनांक २४ एप्रिल ते २ ऑगस्ट २०२४ दरम्यान आरोपी तुषार कवडे याने पॉल पलेरो, सुरेश पाळवदे यांच्याशी संगणमत करून महिलेचा विश्वास संपादन केला. तिला मराठी येत नसल्याने त्यांनी तिची मालमत्ता हडपण्याचा डाव आखला. तिला पत्रव्यवहार करण्यासाठी संमतीपत्र घेतो असे सांगून तिच्याकडून मराठी भाषेत कुलमुखत्यारपत्र तयार करून घेतले.
हे सुद्धा वाचा : पुण्यातील उच्चशिक्षित तरुणाची फसवणूक; तब्बल 80 लाखांना घातला गंडा
दरम्यान त्यानंतर संबंधीत जमीनीचे बनाव दस्त तयार करून सलोनी याच्या कुलमुखत्यार पत्रावरील फोटोवरून कलर फोटो तयार केला. तसेच बनावट सही व अंगठा करून त्या मिळकतीचा कोणताही मोबदला तिला न देता तिची फसवणूक केली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तुषार कवडे याला मुंढवा पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
मनीलॉन्ड्रींगच्या धाकाने सहा लाख उकळले
मगरपट्टा येथील एका तरुणीला आधार कार्डचा गैरवापर करून त्याद्वारे मनी लॉन्ड्रींग झाले आहे. यामुळे यात तुम्हाला अटक करावे लागेल असे सांगून सायबर चोरट्यांनी तरुणीकडून 8 लाख 89 हजार रुपये उकळले आहेत. याप्रकरणी 24 वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार हडपसर पोलिसांनी सायबर चोरट्यांच्या विरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. सायबर चोरट्याने राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विभागातून बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या नावाने मनीलॉन्ड्रींग झाले असून, आधार कार्डचाही गैरवापर करण्यात आला आहे. तुम्हाला अटक होऊ शकते असे धमकावून केस क्लिअर करण्यासाठी एनओसी सर्टीफिकेट देतो असे सांगून तरुणीकडून 5 लाख 89 हजार रुपये उकळल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अमर काळंगे करीत आहेत.