पुण्यातील बुधवार पेठेत एकाच्या खुनाचा प्रयत्न; डोक्यात वीट घातली अन्...
पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. बुधवार पेठेत किरकोळ वादातून एकाच्या डोक्यात वीट मारुन खुनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोघांना फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. हुतात्मा चौकात ही घटना घडली आहे. पोलिसांनी दोघांना पकडले आहे.
याप्रकरणी विनोद अप्पाराव माने (वय ३५, रा. गुरुजी तालीम गणपती मंदिराजवळ, बुधवार पेठ), चिराग भजनलाल निमगावकर (वय ३५, रा. शोनान सोसायटी, नवी पेठ) यांना अटक केली आहे. त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीत किशोर चंद्रकात काळेबेरे (वय ५८, रा. लक्ष्मी रस्ता, गणेश पेठ) गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. काळेबेरे यांनी याबाबत फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, काळेबेरे यांचा आरोपी माने आणि निमगावकर यांच्याशी किरकोळ वाद झाला होता. बुधवारी (१५ जानेवारी) रात्री अकराच्या सुमारास ते छत्रपती शिवाजी रस्त्यावरील हुतात्मा चौकातील (बुधवार चौक) गाडीवर आईस्क्रीम खात थांबले होते. त्यावेळी आरोपी माने आणि निमगावकर यांनी त्यांना शिवीगाळ केली. त्यांना मारहाण करुन डोक्यात वीट मारली. आरोपींनी केलेल्या मारहाणीत काळेबेरे गंभीर जखमी झाले. पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत जवळगी अधिक तपास करत आहेत.
दगडाने ठेचून मुलाचा खून
दरम्यान गेल्या काही दिवसाखाली नगर रस्त्यावरील वाघोली भागात वाघेश्वरनगर येथे एका अल्पवयीन मुलाचा लोखंडी रॉड तसेच दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीला बोलत असल्याच्या रागातून हा खून झाल्याचे सांगण्यात आले आहे. प्रेमप्रकरणातून खून झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. गणेश वाघू तांडे (१७) असे हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मण पेटकर (वय ६०), नितीन पेटकर (वय ३१) आणि सुधीर पेटकर (वय ३२) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास घडली आहे.
राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले
राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली छत्रपती संभाजीनगरमध्ये जुन्या भांडणाच्या कारणातून 26 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. ही घटना सोमवारी (दि.2) सायंकाळी हसूल परिसरातील कारागृहाच्या बाजूच्या मैदानावर घडली. दिनेश उर्फ बबलू परमानंद मोरे (वय 26, रा. चेतनानगर, हसूल) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी अनिकेत गायकवाड व गणेश सोनवणे यांची नावे समोर आली असून, शोधासाठी चार पथके रवाना झाली. या हत्येप्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.