
हडपसरमध्ये टोळक्याचा राडा; गाड्यांची तोडफोड अन् तरुणावर हल्ला
पुणे : हडपसरमधील शिंदे वस्ती परिसरात दुचाकीवर आलेल्या टोळक्याने एका तरुणावर हल्ला करून प्रचंड गोंधळ घातला. तसेच, पार्किंग केलेल्या वाहनांची तोडफोड करून दहशत माजविल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली आहे. एस. सचिन कांबळे (वय २०, रा. हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत ४४ वर्षीय व्यक्तीने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार हे शिंदेवस्ती येथील एसआरए बिल्डींग परिसरात थांबलेले होते. त्यावेळी दोन दुचाकीवर पाच ते सहा जणांचे टोळके त्या ठिकाणी आले. त्यांनी तक्रारदार यांच्यावर लोखंडी हत्याराने हल्ला केला. त्यांना लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. अचानक गोंधळ सुरू झाल्याने नागरिक जमा झाले. तेव्हा टोळक्याने मोठ-मोठ्याने आरडाओरडा करत गोंधळ घातला. तसेच, नंतर पार्किंग केलेल्या वाहनांची तोडफोड करून परिसरात दहशत माजवली. त्यानंतर टोळके पसार झाले. नंतर याची माहिती हडपसर पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पसार झालेल्या एकाला अटक केली आहे. तर पसार झालेल्यांचा शोध घेतला आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.
पुण्यात विद्यार्थ्याला रॉडने बेदम मारहाण
गेल्या काही दिवसाखाली भोसरीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 18 वर्षीय विद्यार्थ्याला ओळखीच्या तिघांनी रॉड व दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना 19 ऑक्टोबर रोजी रात्री 10.45 वाजताच्या सुमारास भोसरीतील हुतात्मा चौकाजवळील परिसरात घडली आहे. जय चोटालिया (वय 19, दिघी रोड, भोसरी), स्वयंम बोऱ्हाडे (वय 22, दिघी रोड, भोसरी) आणि यश निकम (वय 22, गवळी नगर, भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. वेदांत दशरथ जाधव (18, गवळी नगर, भोसरी) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी तू माझ्या बायकोला काय बोलला आणि तू माझ्या वहिनीला मेसेज का केला? या कारणावरून फिर्यादीला लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉड व दगडाने मारहाण केली आहे. या घटनेत फिर्यादीच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला मार लागला असून, उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भोसरी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.