
अलिबाग : अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील व्हिटेक कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट येथे बेकायदेशीरपणे तलवार व लोखंडी शिगा, लाकडी दांडके घेऊन घुसून रुपाली थळे, विजय थळे, मनिषा घरत यांच्यासह इतर दोन जणांवर हल्ला करीत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्ते तथा जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांच्यासह इतर २० आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने ७ वर्ष ३ महिने कारावास व ७ हजार ३०० रुपये दंड अशी शिक्षा गुरुवारी (दि.३०) सुनावली आहे.
राजकीय नेत्यांनाच कायद्याचा धाक राहिला नाही त्यामुळे अलिबागमध्ये गुन्हेगारी वाढत जात असल्याचं समोर आलं आहे. ११ सप्टेंबर २०१२ रोजी सायंकाळी ५.४५ ते ६.१५ दरम्यान चोंढी येथील व्हिटेक कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट येथे पूर्व वैमनस्यातून जिल्हा परिषदेचे तत्कालीन समाजकल्याण सभापती दिलीप भोईर हे २४ साथीदारांसह घुसले होते. यावेळी त्यांच्या हातात तलवारी, लोखंडी शिगा, लाकडी दांडके होते. आरोपींनी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमधील साहित्याची तोडफोड करीत रुपाली थळे यांना मारहाण करीत ठार मारण्याची धमकी दिली. तसेच शिवीगाळ देखील केली. यावेळी दिलीप भोईर यांनी रुपाली थळे यांच्यावर तलवारीने वार करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात रुपाली थळे यांच्या हाताला दुखापत झाली. यांनतर आरोपींनी रुपाली थळे यांना कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमधून बाहेर नेत मारहाण करण्यास सुरुवात केली.
यांनतर थोड्या वेळाने रुपाली थळे यांचे पती विजय थळे आपल्या दोन मित्रांसह घटनास्थळी आले व त्यांनी रुपाली थळे यांना सोडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी दिलीप भोईर यांनी विजय थळे यांच्या डोक्यावर तलवारीने वार केला व इतर आरोपींनी त्यांना मारहाण केली. तसेच विजय थळे यांच्या दोन मित्रांसह बहीण मनिषा घरत यांनादेखील आरोपींनी मारहाण केली. याप्रकरणी मांडवा पोलीस ठाण्यात २५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर खटल्याची सुनावणी अलिबाग येथील जिल्हा सत्र न्यायालयात घेण्यात आली. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता प्रसाद पाटील यांनी १५ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. यामध्ये जखमी, जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, घटनास्थळ पंच प्रसाद गायकवाड यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. समोर आलेल्या साक्षी पुराव्यानुसार जिल्हा मुख्य सत्र न्यायाधीश राजेंद्र सावंत यांनी दिलीप भोईर यांच्यासह इतर २१ जणांना दोषी ठरवीत ७ वर्ष ३ महिने कारावास व ७ हजार ३०० रुपये दंड शिक्षा सुनावली.
या प्रकरणात ४ जणांची निर्दोश मुक्तता करण्यात आली असून निर्दोष सुटलेल्या नितेश सुनील गुरव याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. या प्रकरणात दिलीप भोईर उर्फ छोटम शेठ आणि अन्य काही साथीदारांना शिक्षा ठोठावण्यात आली होती, तर काही जणांना निर्दोष मुक्त करण्यात आले. याच निर्दोष सुटलेल्या नितेश सुनील गुरव या व्यक्तीने निकालाचा धक्का सहन न होताच काही तासांत त्याचा जीव गेल्याचं समोर आलं