कराडमध्ये दोघांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण; कारणही आलं समोर
कराड : राज्यात गुन्हेगारी वाढली असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून खून, मारामाऱ्या, दरोडे यासारख्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता कराडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. चुलता आणि पुतण्याला लोखंडी गज, लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मंगळवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास सैदापूर (ता. कराड) येथील एका लॉजसमोर ही घटना घडली. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश सुनील पाटील ( रा. सिद्धनाथ मंदिराजवळ, वारुंजी, ता. कराड) याने याबाबतची फिर्याद दिली आहे. त्यानुसार आदित्य गायकवाड, अथर्व पाटील, निखिल शेळके, भूषण भोसले, सनी पवार, सौरभ कालेकर, गणराज पवार, पार्थ पाटील, आशिष पाटील (सर्वजण रा. कराड) यांच्यासह अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीमध्ये योगेश पाटील आणि त्याचा पुतण्या प्रथमेश अनिल पाटील हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वारुंजी येथे राहणारा योगेश पाटील हा प्रीतिसंगम घाटावर फिरायला गेला असताना त्याठिकाणी आदित्य गायकवाड त्याला भेटला. त्यावेळी आदित्यच्या मोबाईलमध्ये आपल्या कुटुंबातील फोटो असल्याचे योगेशच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्याने आदित्यकडे त्याबाबतचा जाब विचारला. तसेच घरी गेल्यानंतर योगेशने पुतण्या प्रथमेशला याबाबत सांगितले. त्यानंतर फोटोचा जाब विचारण्यासाठी योगेश आणि प्रथमेश आदित्य गायकवाडला भेटण्यासाठी सैदापूर येथील एका लॉजसमोर गेले.
त्याठिकाणी आदित्य याच्यासह अन्य 9 जणांनी लोखंडी गज, लाकडी दांडके तसेच विटांनी मारहाण केली. त्यामध्ये योगेश आणि प्रथमेश गंभीर जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. याबाबतची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस तपास करीत आहेत.