संग्रहित फोटो
पिंपरी : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, अशातच आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कंबरदुखीमुळे पतीला जवळ येण्यास नकार दिल्याच्या रागातून पतीने पत्नीचा गळा दाबून तसेच चाकूने कंबरेवर आणि बगलेवर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना वाकड येथे घडली आहे. पत्नीला वाचवण्यासाठी आलेल्या मुलीवरही चाकूने वार झाल्याने ती जखमी झाली आहे. याप्रकरणी ३० वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, तिचा पती कृष्णाजी विश्वनाथ सोमवंशी (वय ३५, रा. भाऊसाहेब कलाटे गल्ली नं. १, दत्तमंदिर रोड, वाकड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जखमी मायलेकींवर रुग्णालयात उपचार सुरू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ ऑगस्ट रोजी रात्री दहाच्या सुमारास फिर्यादी त्यांच्या घरातील स्वयंपाकघरात दूध गरम करत असताना आणि कंबरदुखीच्या औषधांच्या गोळ्या घेत असताना आरोपी पतीने मागून येऊन झोपण्यासाठी सोबत येण्यास सांगितले. मात्र, फिर्यादीने नकार दिला. याचा राग आल्याने दोन्ही हातांनी तिचा गळा दाबून श्वास कोंडला. त्यानंतर चाकूने तिच्या कंबरेवर तसेच उजव्या बगलेवर वार करून गंभीर जखमी केले. दरम्यान, मुलगी अंजली भांडण सोडवण्यासाठी आली असता आरोपीच्या चाकूचा वार तिच्या उजव्या गुडघ्याला आणि हाताला लागून तीही जखमी झाली. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग अनावर
पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. दारू पिण्यास पैसे न दिल्याने तरुणाच्या डोक्यात दगड घातल्याची घटना गुलटेकडीतील डायसप्लॉट परिसरात घडली आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाला अटक केली. राजू शिवलिंगप्पा इककळकी (वय ३०, रा. डायसप्लाॅट, गुलटेकडी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी प्रेम संजय काळे (वय २८, रा. डायसप्लाॅट, गुलटेकडी) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत इककळकी याची आई लक्ष्मीबाई (वय ५८) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

