बापाचा राग काढला मुलावर, छातीवर धारधार शस्त्राने सपासप वार; कारण काय तर...
पुणे : कोंढवा भागातील गुन्हेगारी थांबत नसल्याचे चित्र असून, आर्थिक वादातून १४ वर्षीय मुलावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना घडली आहे. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी दाम्पत्याला अटक केली आहे. फरहान उमर शेख (वय १४) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी शाहरुख मोहम्मदीन फिरोज खान, मरियम शाहरुख खान (दोघे रा. हुमेरा मंजिल, शेर खान चाळीसमोर, कोंढवा) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत फरहानची आई मासूम उमर शेख (वय ३५, रा. विजय पार्क, शेर खान चाळीसमोर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, फराहानचे वडील उमर यांचे आरोपी शाहरूख याच्याशी आर्थिक व्यवहारावरून वाद झाले होते. सोमवारी (२२ सप्टेंबर) रात्री पावणेदहाच्या सुमारास आरोपी शाहरुख आणि त्याची पत्नी मरियम हे उमर यांच्या घरी आले. त्यावेळी उमर घरात नव्हते. त्यांनी उमर यांना शिवीगाळ केली, तसेच मुलगा फरहान यालाही शिवीगाळ केली. त्यावेळी फराहानची आई मासूम यांनी मध्यस्थी केली. तेव्हा आरोपींनी मासूम यांना धक्काबुक्की केली. आईला मारहाण केल्यानंतर फराहान चिडला. त्याने आरोपींना शिवीगाळ केली. आरोपींनी फरहानला शिवीगाळ करुन त्याच्या छातीवर शस्त्राने वार केले. या घटनेत तो गंभीर जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपी शाहरूख आणि त्याची पत्नी मरियम यांना अटक करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत. यापूर्वीही अशा घटना कोंढवा परिसरात घडलेल्या असून, कधी टोळके गोंधळ घालताना, तर कधी दहशत माजवताना, हत्यारे घेऊन भरधाव दुचाकीवर फिरताना तसेच वाहनांची तोडफोड करताना दिसत असते. त्यामुळे या भागातील गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
भररस्त्यात एकावर कोयत्याने सपासप वार
स्वारगेट भागात दुधानी गँगने दहशत माजवली आहे. मोक्का रिर्टन आणि सराईतांनी दहशत माजवून एकावर कोयत्याने वार केले आहेत. कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्नही केला आहे. नंतर परिसरात हवेत हत्यारे फिरवून दहशत माजवत गोंधळ घातला. शनिवारी रात्री साडे नऊच्या सुमारास डायसप्लॉट येथे ही घटना घडली. त्यामुळे शहरातील गुन्हेगारांची दहशत कायम असल्याचेही दिसत आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात भक्तीसिंग दुधानी, शक्तीसिंग दुधानी, गोविंदसिंग टाक, आकाशसिंग दुधानी याच्यासह सात जणांविरोधात भारतीय न्याय संहिता १०९, १८९, १८९(२), १९१(२), १९१(३), आर्म ४ (२५), मपोका ३७, (३) सह १३५, क्रिमीनल लॉ अमेंडमेंट ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आबा सरोदे (वय ३९) यांनी तक्रार दाखल केली आहे.