घरासमोर पाणी सांडल्यावरुन वाद; एकाला बेदम मारहाण करुन खुनाचा प्रयत्न
पुणे : पुण्यात गुन्हेगारी वाढली असून, एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील वाकडेवाडी परिसरातील महापालिका वसाहतीत घरासमोर पाणी सांडल्याने झालेल्या वादातून एकाला गजाने बेदम मारहाण करुन खुनाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांवर गु्न्हा दाखल केला आहे.
मुकेश धोबी (वय ३४, रा. म्हसोबा मंदिरासमोर, पीएमसी काॅलनी, वाकडेवाडी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी शंकर खांडेकर, भिकाजी खांडेकर, मुस्कान खांडेकर (तिघे रा. पीएमसी काॅलनी, वाकडेवाडी), तसेच अली इराणी यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत धोबी यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, धोबी आणि खांडेकर कुटुंबीय शेजारी आहेत. घरासमोर पाणी सांडल्याने त्यांच्यात वाद झाला होता. मंगळवारी (८ जुलै) सकाळी साडेसातच्या सुमारास मुकेश धोबी कामानिमित्त घरातून बाहेर पडला. तेव्हा खांडेकर आणि इराणी याने त्याला शिवीगाळ केली. त्यांच्यात वादावादी झाली. खांडेकर यांनी धोबीच्या डोक्यात गज मारला, तसेच त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. भांडणात मध्यस्थी करण्यासाठी आलेले धोबी याची पत्नी, भाऊ, आई, वडील आणि भावजयीला आरोपी खांडेकर, इराणी यांनी गजाने मारहाण केली. त्यांना विट फेकून मारली. सहायक निरीक्षक देशमुख अधिक तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : कॅन्टोन्मेंट महापालिकेत? मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज निर्णय होण्याची शक्यता
पुण्यात टोळक्याकडून एकाला बेदम मारहाण
वैमनस्यातून टोळक्याने एकाला बेदम मारहाण केल्याची घटना हडपसरमधील शिंदे वस्तीत घडली आहे. याप्रकरणी टोळक्यावर गुन्हा दाखल केला आहे. गंभीर दुखापत केल्याप्रकरणी टोळक्यावर हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काकासाहेब शिरोळे (वय ४६, रा. कसबा पेठ) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ऋषीकेश बागुल याच्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरोळे यांनी याबाबत हडपसर पोलिसांत तक्रार दिली आहे.
साताऱ्यातील महिलेच्या खुनाचा लागला छडा
शिवथर येथील खून प्रकरणाचा उलगडा सातारा तालुका पोलिसांनी अवघ्या बारा तासात केला आहे. विवाहितेचा खून गावातील अक्षय रामचंद्र साबळे (वय २८) याने केल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी त्याला रात्री पुणे येथील स्वारगेट मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपण हा खून केल्याची कबुली दिली. सातारा तालुका पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरून संशयिताला ताब्यात घेतले. अनैतिक संबंधातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.