
कोथरुड हादरलं! टोळक्याकडून तरुणाचा खून; तलवार अन् कोयत्याने सपासप वार
पुणे : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. जुना वाद तसेच पत्नीशी घातलेल्या वादातून एका तरुणाचा नऊ जणांच्या टोळक्याने तलवारीने सपासप वार करून तसेच गोळी झाडून एकाचा निर्घृण खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. दोन दिवसांपूर्वी कोथरूडमध्ये कुख्यात गुंड गजा मारणे याच्या टोळीतील तरुणांनी निरपराध तरुणाला मारहाण केल्यानंतर चांगलेच वातावरण तापले होते. नंतर तरुणाच्या खुनाने कोथरूड पुन्हा हादरले आहे.
गौरव अविनाश थोरात (वय २२, रा. मराठा महासंघ सोसायटी शास्त्रीनगर कोथरूड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. कोथरूड पोलीस ठाण्यात याप्रकरणी 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शास्त्रीनगर येथील दत्त मंदिराजवळ रविवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिनेश भालेराव (वय २७), सोहेल सय्यद (वय २४), राकेश सावंत (वय २४), साहिल वाकडे (वय २५) बंड्या नागटिळक (वय १८), लखन शिरोळे (वय २७) अनिकेत उमाप (वय २२) यांच्यासह आणखी काही आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. सागर वसंत कसबे (वय ४७) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, गौरव आणि यातील एका आरोपीचे जुने वाद होते. गौरव याने त्याच्या पत्नीसोबत देखील वाद घातला होता. नंतर, दोन दिवसांपूर्वी त्यांच्यात यावरून भांडण झाले होते. दरम्यान रविवारी मध्यरात्री गौरव हा शास्त्रीनगर येथील दत्त मंदिराजवळ मित्रांसोबत बसला होता. यावेळी त्याठिकाणी सोहेल सय्यद व त्याचे इतर साथीदार तिथे आले. सोहेलने जुन्या भांडण्याच्या कारणावरून गौरवच्या दिशेने गोळी झाडली. मात्र गौरवला गोळी लागली नाही. त्यानंतर इतर आरोपींनी तलवार व कोयत्याने गौरव याच्यावर हल्ला केला. त्याच्यावर टोळक्याने एक सलग सपासप वार केले. यात गौरव यांच्या मान, डोके अन् पोटावर व पायावर वार करून त्याचा खून केला. त्यानंतर टोळके पसार झाले. घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलीस व गुन्हे शाखेने घटनास्थळी धाव घेतली. तसेच पसार झालेल्या आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
पुतण्याने केला चुलत्याचा खून
आर्थिक वादविवादातून पुतण्याने चुलत्यावर लोखंडी हत्याराने वार करून त्यांचा खून केल्याची घटना गेल्या काही दिवसाखाली पाषाण येथे घडली आहे. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला असून तिघांना ताब्यात घेतले आहे. महेश जयसिंगराव तुपे (वय.५६,रा. पाषाण) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी महेश यांचा मुलगा वरद तुपे (वय १९) याने तक्रार दिली आहे. त्यावरून शुभम महेंद्र तुपे (वय २८), रोहन सूर्यवंशी (वय २०) आणि ओम बाळासाहेब निम्हण (वय २०, रा. सर्व पाषाण) यांना अटक केली आहे.