crime (फोटो सौजन्य: social media)
परळी तालुक्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील सरडगाव येथे कौटुंबिक वादातून एका भावाने भावाच्या शेतातील ३ एकर कपाशीच्या पिकावर तणनाशकाची फवारणी करून ते पूर्णतः नष्ट केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे पीडित शेतकरी भावाचे लाखोंचे नुकसान झाले आहे. तो आर्थिक संकटात सापडला आहे. कौटुंबिक वादामुळे मनात राग धरून त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.
नेमकं प्रकरण काय?
परळी तालुक्यातील सरडगाव येथील शेतकरी नारायण नवनाथ गोल्हेर यांनी गट क्रमांक ७६ आणि २११ मधील आपल्या ३ एकर शेतीत मोठ्या मेहनतीने कपाशीची लागवड केली होती. पिकाची स्थिती अत्यंत चांगली होती. त्याला भरपूर बोंडंही लागली होती. त्यांनी या पिकासाठी सुमारे दीड लाख रुपये खर्च केले होते. यातून त्यांना पाच ते साडेपाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा होती.
या दरम्यान, नारायण गोल्हेर आणि त्यांचे भाऊ शिवाजी नवनाथ गोल्हेर यांच्यात कौटुंबिक वाद सुरू होते. याच वादातून शिवाजी गोल्हेर याने रात्रीच्या वेळी शेतात प्रवेश करून ‘राऊंड अप’ नावाचे तणनाशक मोठ्या प्रमाणात कपाशीच्या पिकावर फवारले. या विषारी फवारणीमुळे डोळ्यादेखत संपूर्ण कपाशीचे पीक करपून नष्ट झाले.
गुन्हा दाखल
या घटनेनंतर पीडित शेतकरी नारायण गोल्हेर हे तात्काळ परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाले. पोलिसांनी आरोपी शिवाजी गोल्हेर यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ३२४, ३५२/२, आणि ३५१/३.३/५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गंभीर नुकसानीमुळे हवालदिल झालेल्या नारायण गोल्हेर यांनी प्रशासनाकडे मदतीची मागणी केली आहे.
पीडित व्यक्तीची विनंती
“माझ्या तीन एकर शेतीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने तात्काळ पंचनामा करून मला योग्य ती आर्थिक मदत द्यावी,” अशी विनंती त्यांनी केली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच, भावानेच केलेल्या या कृत्यामुळे कौटुंबिक संबंधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.