बारामती: ‘बारामती शहरात वाहतूक शाखेने ‘काळ्या काचा’विरोधात राबवलेली मोहीम आता अधिक आक्रमक झाली असून, अवघ्या १५ दिवसांत स्कॉर्पिओ, थार, फॉर्च्यूनर, वेर्ना, स्विफ्ट ते अगदी अल्टोपर्यंत तब्बल १५२ चारचाकी वाहनांवर थेट कारवाई करण्यात आली आहे.आत्तापर्यंत ९ लाख ७५ हजारांचा दंड आकारण्यात आला आहे.
वाहने गुन्हेगारी हेतूने वापरणाऱ्या प्रवृत्तींना पोलिसांनी चांगलाच चाप लावला असून, या मोहिमेदरम्यान काही तडीपार व गंभीर गुन्हे असलेल्या आरोपींचा देखील शोध लागला आहे. वाहनांची काळी काच उतरवून, दंड आकारून ती डिटेन करण्यात आली आहेत. याआधी वारंवार दंड केल्यानंतरही वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन सुरूच राहिल्यामुळे, वाहतूक विभागाने मोहीमच सुरू करून थेट कारवाईचा धडाका सुरु केला. उपक्रमशील पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई राबवली जात असून, शहरातील विविध चौकांमध्ये तपासणी सुरू आहे.
विशेषतः कोर्ट कॉर्नर चौक कसबा चौक परिसरात गेल्या दोन दिवसांपासून तपासणी अधिक तीव्र करण्यात आली आहे. वाहनांवरील नंबर प्लेट लपवणे, नंबर अतिशय लहान लिहिणे अशा पद्धतीने पोलिसांची दिशाभूल करणाऱ्यांवरही कडक कारवाई होत आहे. काळ्या काचा लावलेल्या वाहनांमुळे कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण होतो. अनेक वेळा अशा वाहनांचा वापर गुन्ह्यांमध्ये होतो. त्यामुळेच ही मोहीम गरजेची होती. गाडीच्या काचा ‘काळ्या असतील किंवा कुठे शंका वाटल्यास तात्काळ ९९२३६३०६५२ या क्रमांकावर माहिती संपर्क साधावा,’ असे आवाहन पोलीस निरीक्षक यादव यांनी केलं आहे.