सोशल मिडीया - सौजन्य फोटो
भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बारवर मीरा-भाईंदर पोलिसांनी छापा टाकून १७ तरुणींची सुटका केली आहे. या कारवाईदरम्यान १५ ग्राहकांसह बारमधील व्यवस्थापक, कर्मचारी आणि कॅशियर अशा एकूण २६ जणांना ताब्यात घेण्यात आले. पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे परिसरातील बारमधील कथित गैरप्रकारांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी संबंधित बारमध्ये छापा टाकला असता स्टेजवर सात तरुणी आढळून आल्या. तसेच कॅव्हिटी एरियामध्ये अन्य दहा तरुणी असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी या सर्व १७ तरुणींना बारमधून बाहेर काढून त्यांची सुटका केली.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी १५ ग्राहक, दहा मॅनेजर, स्टेवर्ड आणि वेटर तसेच एका कॅशियरला ताब्यात घेतले. घटनास्थळावरून सुमारे ६० हजार रुपये रोख रक्कम आणि अंदाजे ५० हजार रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांची कारवाई सुरू असताना बारचा मालक आणि संचालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, बारमध्ये नेमके कोणते नियमभंग किंवा गैरप्रकार सुरू होते, तसेच या प्रकरणात कोणत्या कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई केली जाणार आहे, हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, या प्रकरणातील पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे.






