भाईंदर/विजय काते : वसई विरार आणि मिरा-भाईंदर परिसरात अमली पदार्थ विक्री आणि सेवनावर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या अधिपत्याखाली अमली पदार्थविरोधी पथकांनी गेल्या सहा महिन्यांत जोरदार मोहीम राबवली आहे. या कालावधीत तब्बल 54 कोटी 98 लाख 210 रुपयांचा अमली पदार्थ साठा जप्त करण्यात आला आहे.
या मोहिमेत 803 गुन्हे दाखल करण्यात आले असून 219 जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये परदेशी नागरिकांचा, विशेषतः नायजेरियन नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.
नायजेरियन नागरिकांची भूमिका संशयास्पद
नालासोपारा, वसई, विरार परिसरात मोठ्या प्रमाणात नायजेरियन नागरिक वास्तव्यास असून, अनेक प्रकरणांमध्ये त्यांचा अमली पदार्थांच्या विक्रीत थेट सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अलीकडील नालासोपाऱ्यातील एका कारवाईत तिघेही आरोपी नायजेरियन नागरिक होते.
जनजागृती आणि नागरी सहभाग
पोलीस विभागाने शाळा, महाविद्यालयांमध्ये जनजागृती मोहिमा राबवून तरुणांमध्ये अमली पदार्थांविषयी चेतना निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. घरमालकांना त्यांच्या भाडेकरूंची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक करण्यात आले असले तरीही अनेक परदेशी नागरिक विनापरवाना वास्तव्य करत असल्याने त्यांच्या विरोधात कारवाईची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे.
मोठ्या कारवाया आणि अडकलेले आकडे
पोलिसांनी केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे, तर परजिल्हा आणि परराज्यात जाऊन अमली पदार्थ तयार करणारे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. या मोहिमेत एमडी, चरस, गांजा, कोडीन पावडर यासारख्या महागड्या आणि प्राणघातक पदार्थांचा समावेश आहे.
गांजाचे 46 गुन्हे,
एमडीचे 36 गुन्हे,
चरस आणि कोकनचे गुन्हेअसे मिळून 803 गुन्ह्यांमध्ये एकूण 219 जणांना अटक, तर 704 जणांविरोधात सेवन प्रकरणी गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
पुढील उपाययोजना
पोलीस आयुक्तालयाच्या वतीने अमली पदार्थांचा पुरवठा रोखण्यासाठी तांत्रिक यंत्रणा, नागरी संवाद, गुप्तचर यंत्रणा आणि अधिक कठोर कायदेशीर कारवाया सुरू ठेवण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. “अंमली पदार्थविरोधी लढा ही केवळ पोलिसांची जबाबदारी नाही, तर संपूर्ण समाजाने एकत्र येऊन या संकटाचा मुकाबला करणे गरजेचे आहे,” स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे.