9 वर्षीय मुलीवर बलात्कार नंतर चिरला गळा (फोटो सौजन्य-X)
बिहारमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये या मुलीला वेळेत उपचार न मिळाल्याने पीडित मुलीचा मृत्यू झाला. तसेच रुग्णालयाने हलगर्जीपणा दाखवल्यामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप पीडितेच्या नाकेवाईकांनी केला आहे.
मुझफ्फरपूरमधील कुधनी येथील ९ वर्षीय महादलित मुलीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेने लोकांना धक्का बसला आहे. २६ मे रोजी संध्याकाळी ही घटना घडली. ६ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर रविवारी पाटण्याच्या पीएमसीएसमध्ये अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला.या घटनेनंतर मृतदेह पीडितेच्या गावात पोहोचला तेव्हा लोकांचा संताप उफाळून आला. कुटुंब आरोपी रोहित साहनीच्या घरासमोर अंत्यसंस्कार करण्यावर ठाम होते. त्यानंतर प्रशासनाने लोकांना समजावून सांगून अंतिम संस्कार केले. संपूर्ण प्रकरणात पीएमसीएचवर उपचारात घोर निष्काळजीपणाचा आरोप आहे. येथे आरोपींवर कठोर कारवाई करण्याची आणि न्यायाची मागणी केली जात आहे. काँग्रेसने हा विषय उचलून धरला असून मुझफ्फरपूरपासून पाटणा आणि दिल्लीपर्यंत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
रविवारी अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कारानंतर पीएमसीएचमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह गावात नेण्यात आला. मोठ्या संतापाच्या वातावरणात तिथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. गावात पोलिस बंदोबस्त तैनात आहे. शनिवारी, पीडितेला एसकेएमसीएच, मुझफ्फरपूर येथून पीएमसीएच पाटणा उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र या रुग्णालयात उपचारात निष्काळजीपणा करण्यात येत होतो, असा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू झाला,अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
कुटुंबीयांचा आरोप आहे की, त्यांना रुग्णालयात एका विभागातून दुसऱ्या विभागात धाव घ्यावी लागली. या काळात मुलीला ४ तास रुग्णवाहिकेत त्रास सहन करावा लागला. जर तिला वेळेवर बेड आणि उपचार मिळाले असते तर कदाचित मुलगी आज जिवंत असती, अशी प्रतिक्रिया कुटुंबातील सदस्यांकडून देण्यात आली.
याप्रकरणी काँग्रेस नेत्या आणि माजी खासदार रंजिता रंजन यांनी प्रशासन आणि पीएमसीएसच्या वृत्तीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्या म्हणाल्या की, राज्य सरकारच्या सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयात मुलीला योग्य उपचार मिळाले नाहीत. बलात्कार आणि खून प्रकरणातील आरोपी रोहित साहनी याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्याने याआधीही त्याच्या कुटुंबात असे कृत्य केले आहे. तरीही तो मुक्त फिरत होता. जर त्याला त्यावेळी अटक करून तुरुंगात पाठवले असते तर कदाचित अल्पवयीन मुलीसोबत अशी घटना घडली नसती.
राहुल गांधी यांनीही ट्विटरवर या घटनेचा निषेध केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे की, मुझफ्फरपूरमध्ये दलित अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार आणि त्यानंतर उपचारात झालेला निष्काळजीपणा अत्यंत लज्जास्पद आहे. जर तिला वेळेवर उपचार मिळाले असते तर तिचा जीव वाचू शकला असता.
पीएमसीएच म्हणते की, मुलीच्या उपचारात कोणताही निष्काळजीपणा झाला नाही. रुग्णवाहिकेत उपचार सुरू करण्यात आले. ईएनटीमध्ये आयसीयू नव्हता. त्यामुळे तिला स्त्रीरोग विभागात दाखल करण्यात आले. मुलगी ३ तास स्थिर होती. त्यानंतर ती व्हेंटिलेटरवर गेली. घशातून जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे रविवारी सकाळी ८ वाजता तिचा मृत्यू झाला.
मृताच्या आईने सांगितले की, ज्याप्रमाणे माझ्या मुलीचा वेदनेने मृत्यू झाला, त्याचप्रमाणे आरोपींनाही शिक्षा मिळावी अशी माझी इच्छा आहे. या घटनेबद्दल ग्रामस्थांमध्येही प्रचंड संताप आहे. सर्वजण कठोर कारवाई आणि न्यायाची मागणी करत आहेत.
ही घटना २६ मे रोजी दुपारी ४ वाजता घडली. त्याच गावातील रहिवासी ३४ वर्षीय रोहित साहनी याने मुलीला तिच्या मावशीच्या घरी नेण्याच्या बहाण्याने सोबत नेले. त्यानंतर तिच्यावर निर्घृण बलात्कार करण्यात आला. बराच वेळ मुलगी घरी न परतल्याने लोकांनी तिच्या आईला सांगितले की ती रोहितसोबत गेली आहे. शोध घेतल्यानंतर मुलगी मक्याच्या शेतात बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिच्या मानेवर आणि छातीवर खोल जखमा होत्या. त्यानंतर तिला तातडीने एसकेएमसीएचमध्ये दाखल करण्यात आले.