crime (फोटो सौजन्य: social media)
बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका दुकानदाराने सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या केली. या घटनेत आता धक्कादायक बाब समोर आली आहे. वेळेवर पैसे देणे होत नसेल, तर तुझी पत्नी माझ्या घरी आणून सोड, अशी धमकी सावकाराने मयत व्यक्तीला दिली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी या कपडा व्यावसायिकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव राम फाटले असे आहे.
नेमकं काय प्रकरण?
राम फाटले यांनी सात वर्षांपूर्वी सावकाराकडून अडीच लाख रुपये १० टक्के व्यंजनाई उसने घेतले होते. याची परतफेड देखील 25 हजार रुपये प्रति महिनाप्रमाणे करण्यात आली. मात्र पैसे देऊन देखील सावकारी जाच कमी होत नव्हता. तुच्याकडून वेळेवर पैसे देणे होत नसेल, तर तुझी पत्नी माझ्या घरी आणून सोड. असे सावकाराने म्हंटले. राम फाटले यांचा सावकाराने वेळोवेळी मानसिक छळ केला. याच मानसिक त्रासाला कंटाळून राम फाटले यांनी आपली जीवन यात्रा संपवली.
डोळ्यात पाणी आणणारं पत्र
प्रिय आई आणि पप्पा
सुजय, गौरी आणि रेणुका
मी चांगला मुलगा, पती आणि वडील होऊ शकत नाही. तरी मला माफ करा. रेणुका तुला माझी जागा घेऊन माझे आई-वडील, सुजय आणि गौरी यांची काळजी घ्यावी लागेल. शाम भाऊ लखन माझे मुले आणि बायको, आई-वडील यांना सांभाळा. मला माफ करा, तुम्हा सर्वांचा राम.
माझे आई-वडील यांच्याकडे माझ्या मातीसाठी पैसे नाहीत. माझी माती समाजाकडून वर्गणी काढून करावी. माझं दहावं, तेरावं आणि चौदावं करु नका. माझं वर्षश्राद्ध करु नका, ही माझी इच्छा आहे. रेणुका मी तुझ्यावर माझ्या परिवाराची जबाबदारी देऊन जात आहे. तुला यापुढे खंबीरपणे सर्वांशी झगडावे लागेल.
तुझा राम
आत्महत्यास कारणीभूत असलेल्या व्यक्तीचे नाव चिठ्ठीत
मी आत्महत्या करण्यास कारणीभूत असलेली व्यक्ती डॉ. लक्ष्मण जाधव व त्यांची पत्नी वर्षा जाधव आहेत. त्यांनी मला मानसिक त्रास दिला व माझा छळ केला. मी त्यांच्याकडून व्याजाने उसने रुपये घेतले होते. मी त्यांना रक्कम परत केली होती. पण माझे चेक बोर्ड परत दे म्हणालो अजून रक्कम दे. माझे बँक खाते, पत्नी आणि मुलीचे बँक खाते बँक ऑफ बडोदामध्ये आहे. साहेब त्यांच्याकडून सर्व रक्कम परत घेऊन माझ्या परिवाराला परत देण्यात यावी, ही नम्र विनंती. गेल्या सहा-सात वर्षांपासून मी त्यांना रक्कम देत आहे. तरी माझे बँक खाते तपासून रक्कम परत देण्यात यावी. ही आपणास विनंती.
गुन्हा दाखल
या प्रकरणी पेठ बीड पोलिसांनी सावकार डॉ. लक्ष्मण जाधव आणि त्याच्या पत्नीसह एकूण सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींच्या शोधासाठी एक पथक रवाना करण्यात आले आहे. यातील मुख्य संशयित आरोपी डॉ लक्ष्मण जाधव हा भाजपचा पदाधिकारी आहे.
Beed Crime : सावकारी जाचाचा कंटाळा, एकाने उचलले टोकाचे पाऊल; सुसाईड नोटमध्ये ‘राजकीय’ खुलासा..