
बुलढाण्यात १४ वर्षीय मुलाची हत्या
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अंबाशी येथील दहा वर्षीय बालकाचे त्याच्या नातेवाईकानेच अपहरण केले आणि त्यानंतर त्याची हत्या केल्याच्या घटनेला काही तास लोटत नाहत तेच शेगाव तालुक्यातील नागझरी येथील चौदा वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
हत्या झालेल्या मुलाचे नाव कृष्णा कराळे असे आहे. या मुलाची हतोड्याने घाव घालून हत्या करण्यात आली आहे. हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह भास्तनच्या जंगलात पोत्यामध्ये भरून फेकण्यात आला आहे. ही घटना उघडकीस येताच संतप्त नातेवाईक आणि गावकऱ्यांनी काल शेगाव पोलीस ठाण्याला घेराव घातला होता. दरम्यान, शेजाऱ्यानेच हे हत्याकांड केले असल्याचे समोर आले असून या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – RNO)
नागझरीमधील घटना
शेगाव तालुक्यातील नागझरी येथील 14 वर्षीय कृष्णा राजेश्वर कराळे हा 23 जुलैपासून बेपत्ता झाला होता. हा मुलगा मंगळवारी सकाळी 10 वाजता शिकवणी वर्ग व शाळेला गेला होता. सायंकाळपर्यंत तो परतला नाही म्हणून घरच्यांनी शोधाशोध केली. अखेर त्याचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आली होती.
पोलिसांनी संयशियांना पाहिले
कृष्णा हा बुरुंगले विद्यालयात आठवीत शिक्षण घेत होता. दरम्यान, 23 जुलै रोजी सकाळी 7 वाजून 50 मिनिटांनी कृष्णाला एक संशयित मोटारसायकलवरून घेऊन जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना प्राप्त झाले होते. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. संशयिताच्या मोबाईलचे लोकेशन घेण्यात आले. त्यानुसार रुपेश वारोकार (22, रा. नागझरी) याला 24 जुलै रोजी सायंकाळी जळगाव जामोद येथे ताब्यात घेण्यात आले.
हेदेखील वाचा – अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या; लोणंद पोलिसांची कारवाई
चौकशी केल्यावर उघड
कसून चौकशी केली असता अपहरण झालेल्या कृष्णाची हत्याच झाल्याची माहिती समोर आली. हत्येच्या कटात पृथ्वीराज मोरे (21, रा. नागझरी) हा देखील सहभागी असल्याचे आरोपीने सांगितल्याने त्याला देखील अटक करण्यात आली आहे. मृत कृष्णाच्या शेजारचाच रुपेश वारोकार हा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.
भास्तनच्या जंगलात कृष्णाचा मृतदेह आढळून आला. जवळच त्याची स्कूल बॅगही पडलेली होती. तसेच लोखंडी हतोडासुद्धा आढळून आला होता. पोलिसांनी हे साहित्य जप्त केले आहे. अशी माहिती खामगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी दिली आहे.