बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश; सीबीआयकडून पुण्यासह विविध शहरांमध्ये छापे
पुणे : एक मोठी बातमी समोर आली आहे. सीबीआयने पुण्यासह विविध शहरांमध्ये छापे टाकून बेकायदा बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पाच संशयितांना अटक करण्यात आली आहे. बनावट कॉल सेंटर चालविणाऱ्या रॅकेटने अनेक देशांतील नागरिकांची फसवणूक केली आहे. पाच संशयितांना हैदराबादमधून अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना पुण्यातील न्यायालयात हजर करण्यात आले. सीबीआयने पुण्यासह हैदराबाद, वाराणसी, विशाखापट्टणम आणि अहमदाबाद शहरात छापे टाकले. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी आरोपींच्या कॉल सेंटरमधून ५० मोबाईल, ३८ संगणक आणि कागदपत्रे जप्त केली आहेत.
आरोपींकडून एमएसवीसी इन्फ्रॉमेट्रिक्स प्रा. लि., आत्रिया ग्लोबल सर्विसेस प्रा. लि. आणि विआजेस सोल्यूशन्स या नावाने बनावट कॉल सेंटर चालविण्यात येत होते. आरोपींनी रिमोट अॅक्सेस सॉफ्टवेअरचा वापर करून परदेशी नागरिकांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय गिफ्ट कार्ड खरेदी करण्यासाठी प्रवृत्त करून आरोपींनी दोन परदेशी नागरिकांची २० हजार डॉलर्सची फसवणूक केली होती.