संग्रहित फोटो
श्रीगोंदा (अहिल्यानगर): घरातील लहान बाळाला गावरान गाईचे दूध मिळावे म्हणून गाय आणि कालवड खरेदी करून घरी घेऊन जात असलेल्या व्यक्तीला रस्त्यात अडवून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार शिवारात घडल्याचे समोर आले आहे. विजय शेळके आणि वाहनचालक महेश जाधव यांना काठ्या आणि लोखंडी टामीने मारहाण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात १५ ते २० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, १५ ही आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.
गाय-कालवड घेऊन जाताना अडवले
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, ५ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे दीडच्या सुमारास टाकळी लोणार ते पिसोरे खांड रस्त्यावर ही घटना घडली. विजय शेळके आणि वाहनचालक महेश जाधव हे गाय आणि कालवड घेऊन गुणवडीच्या दिशेने जात होते. त्यावेळी काही जणांनी त्यांचा पाठलाग करून वाहन अडवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच वाहन थांबवल्यानंतर आरोपींनी विजय शेळके आणि महेश जाधव यांना काठ्या तसेच लोखंडी टामीने मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत दोघेही जखमी झाले. त्यांच्यावर श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.
२१ हजार रुपये घेतल्याचा आरोप
मारहाणीदरम्यान विजय शेळके यांच्या खिशातील २१ हजार रुपयांची रोख रक्कम बळजबरीने काढून घेतल्याचाही आरोप फिर्यादीने केला आहे. या घटनेनंतर शेळके यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. फिर्यादी विजय शेळके यांच्या म्हणण्यानुसार, घरातील लहान बाळाला गावरान गाईचे दूध मिळावे म्हणून त्यांनी टाकळी लोणार येथील पंडित दरवडे यांच्याकडून व्यायलेली कालवड असलेली गावरान गाय खरेदी केली होती. गाय आणि कालवड घेऊन ते गुणवडीला जात असताना हा प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले.
अपमानास्पद कृत्य केल्याचा गंभीर आरोप
या प्रकरणातील तक्रारीत शेळके यांच्यासोबत अपमानास्पद वर्तन केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यांचे कपडे काढून अपमान केल्याचे तसेच पाण्याच्या बाटलीत लघवी करून ती जबरदस्तीने पाजल्याचे फिर्यादीत नमूद असल्याचे समोर आले आहे. या कथित प्रकाराचा मोबाईलमध्ये व्हिडिओ काढल्याचाही दावा करण्यात आला आहे. हे आरोप पोलिस तपासाचा विषय आहेत.
हेही वाचा: Mumbai Crime: आधी घराचे भाडे भरले, नंतर अचानक गायब; १९ जणांची कोट्यवधींची फसवणूक
१५ ते २० जणांवर गुन्हा
या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात १५ ते २० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी १५ आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती आहे. घटनेमागील नेमके कारण, सहभागी व्यक्तींची भूमिका आणि कथित मारहाणीबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे कायदा हातात घेऊन नागरिकांना अडवणे किंवा मारहाण करण्याच्या प्रकाराबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिसांकडून तक्रारीतील आरोपांची चौकशी करून पुढील कारवाई केली जात आहे.






