(Photo - X)
Supriya Sule on MPSC Paper leak : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. विद्यार्थ्यांचा हा प्रश्न तातडीने सोडवला पाहिजे, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “हा अतिशय गंभीर विषय आहे. मुख्यमंत्री सध्या नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी गेले आहेत. मात्र, या सगळ्या कार्यक्रमांपेक्षा सध्या MPSC आणि दुष्काळाच्या प्रश्नाला प्राधान्य दिलं पाहिजे,” असं त्या म्हणाल्या.
यावेळी सुप्रिया सुळेंनी एक धक्कादायक अनुभवही सांगितला. त्या म्हणाल्या, “काल रात्री १२ वाजून १२ मिनिटांनी एका महिलेचा फोन आला होता. संबंधित महिला रडत होती आणि न्याय मिळाला नाही तर आत्महत्या करणार असल्याचं ती सांगत होती. या प्रकारामुळे आपण घाबरलो आणि त्या फोनचा स्क्रीनशॉट पोलिसांना पाठवला,” असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.
यावेळी सुप्रिया सुळे यांनी पेपरफुटीच्या मुद्यावरून सरकारला घेरत “आपलेच पेपर कसे फुटत आहेत?” असा थेट सवालही सरकारला केला. “आज AIच्या क्षेत्रात बारामती-साताऱ्यातील शेतकरीही उतरला आहे. मग महाराष्ट्र सरकार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून परीक्षा यंत्रणा सुरक्षित का करू शकत नाही,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
“चूक यंत्रणेची आणि सरकारची आहे. यापुढे यंत्रणेत सुधारणा झाली पाहिजे,” असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना तातडीने बोलावून हा विषय मार्गी लावावा, अशी मागणी केली. हा प्रश्न केवळ काही विद्यार्थ्यांचा नसून अशा अनेक प्रकरणांचा असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांच्या अपघाती मृत्यूच्या मुद्द्यावरून विरोधकांनी हा विषय सोडू नये, अशी भूमिका मांडली होती. यावर सुप्रिया सुळे यांनी मात्र “मी या विषयावर बोलणार नाही”, असं स्पष्ट केलं.
“संजय राऊत हे राज्याचेच नव्हे तर देशाचे मोठे नेते आहेत. मात्र, या विषयावर सरकारलाच प्रश्न विचारला पाहिजे. लोकांना आपण या विषयावर बोललेलं आवडत नाही,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.






