
चाकूने भोसकून सराईत गुंडाची हत्या
नागपूर : प्रेयसीला दुसऱ्या तरुणासोबत पाहिल्यावरून झालेल्या वादानंतर सराईत गुंडाची चाकूने भोसकून हत्या केली. ही घटना गुरुवारी सायंकाळी नरेंद्रनगर परिसरात घडली. नरेंद्रनगर रिंग रोडवर दोघांमध्ये झालेल्या झटापटीत तरुणाने चाकू हिसकावून गुन्हेगाराच्या छातीत भोसकला. गंभीर जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अजनी पोलिसांनी तत्काळ आरोपीला ताब्यात घेतले. अवघ्या पाच दिवसांत शहरात पाच हत्या झाल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
गौरव पंकज रगडे (वय ३०, रा. कुंजीलालपेठ, अजनी) असे मृताचे नाव आहे. गौरव रामभाऊ राऊत (वय २७, मूळ रा. दिग्रस, यवतमाळ) असे आरोपीचे नाव आहे. तो काही महिन्यांपासून नरेंद्रनगर येथील सुंदरबन परिसरात देशमुख यांच्या घरात भाड्याने राहत होता. मिळालेल्या माहितीनुसार, रगडे हा पोलिस अभिलेखावरील गुन्हेगार होता. जुनी शुक्रवारी येथील गमछू लांबट आणि अजनीतील गौत्या यांच्या हत्या प्रकरणात त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल होते. याशिवाय लूटमारीचेही गुन्हे त्याच्यावर होते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी लूटमारीच्या प्रकरणात तो कारागृहातून जामिनावर आला होता. मूळची मुंबई येथील दीपाली विजय साळुंखे ऊर्फ बाली हिच्याशी रगडेचे दीड वर्षापासून प्रेमसंबंध होते. दोघे पती-पत्नीप्रमाणे रगडेच्या घरी राहत होते.
खोलीत मद्यपानाची मैफल
गुरुवारी दुपारी ३ वाजता बाली राऊतला भेटण्यासाठी नरेंद्रनगर येथील खोलीवर गेली. त्यावेळी राऊतचे दोन मित्रही तेथे उपस्थित होते. चौघांनी मिळून मद्यपान केले. सायंकाळी ४.३० वाजता बाली राऊतच्या खोलीत असल्याची माहिती रगडेला मिळाली. संतप्त झालेल्या रगडेने खोलीवर धावा बोलला. राऊत आणि त्याच्या साथीदारांनी मागील दरवाजातून पळ काढला. रगडेने राऊतचा पाठलाग सुरू केला.
झटापटीत चाकू हिसकावून छातीत भोसकला
झटापटीदरम्यान राऊतने रगडेच्या छातीत चाकू भोसकला. रगडे घटनास्थळीच कोसळला. राऊत पसार झाला. माहिती मिळताच अजनी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. गुन्हे शाखेच्या पथकाने राऊतचा शोध सुरू केला आणि रेल्वे मार्गावरील आरयूबीजवळ त्याला ताब्यात घेतले.
Daund Murder : दौंडमध्ये 70 वर्षीय महिलेचा धारदार शस्त्राने खून; 12 तासात 2 आरोपींना ठोकल्या बेड्या