
Cyber Crime : MBBSच्या विद्यार्थ्यांनो सावधान, ही चुक केलात तर करिअर होईल खराब! सायबर विभागाच्या हाती मोठं रॅकेट
महाराष्ट्र सायबर विभागाने (Cyber Crime) बनावट डॉक्टरांचे एक मोठं आंतरराज्य नेटवर्कचा भांडाफोड केला आहे. ही टोळी परदेशातून MBBSची पदवी घेऊन परतलेल्या विद्यार्थ्यांसाठी फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन (FMGE) चे बनावट स्कोरकार्ड (गुणपत्रिका) आणि प्रमाणपत्र बनवते, जेणेकरून हे विद्यार्थी भारतात डॉक्टरच्या रुपात आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकतील. याच टोळीचे कच्चे चिट्टे महाराष्ट्र सायबर विभागाने जगासमोर आणले आहे.
हे प्रकरण तेव्हा समोर आले जेव्हा महाराष्ट्र मेडिकल काउंसिल (MMC)ने नोंदणीसाठी आलेल्या अर्जांची छाननी केली. काउंसिलला शंका आली की, काही परदेशी मेडिकलचे ग्रॅज्युएट्सने बंधनकारक असलेली FMGE स्क्रीनिंग चाचणी उत्तीर्ण केलेली नाही, तरी देखील त्यांच्याकडे मेडिकल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट उपलब्ध आहे. MMC ने त्यानंतर तातडीने स्थानिक सायबर पोलीस स्टेशन, महाराष्ट्र सायबर आणि मुंबईत एक तक्रार नोंदवली.
महाराष्ट्र सायबरने टेक्निकल अॅनालिसिस, डिजिटल रेकॉर्ड आणि सिस्टम लॉग्सचा सखोल तपास करत या धोखाधडीत समाविष्ट असलेल्या लोकांची ओळख पटवली. आतापर्यंत याप्रकरणी या प्रकरणाच्या म्होरक्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये वरुण प्रतापराव आखाडे (28) आणि संकेत प्रभाकर उन्हाळे (26) यांचा समावेश आहे. दोघेही बुलढाणाचे राहणारे आहेत. तपासात असे समोर आले की, हे दोघे स्वतः FMGE परिक्षेत नापास झालेत. तरी देखील बनावट प्रमाणपत्राद्वारे डॉक्टरच्या रुपात प्रॅक्टिस करण्याच्या हे प्रयत्नात होते.
Pune Crime: पुण्यात खळबळ! ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात चोरी, ५०-६० हजारांची रोकड गायब
तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा आरोपी असलेला राहुल गोपाल पाटील (35) हा नाशिकचा रहिवाशी असून तो या संपूर्ण आंतरराज्यीय टोळीचा मास्टरमाइंड आणि ऑपरेटर असल्याचे सांगण्यात येत आहे. तपासात असे समोर आले की, त्याने पैशांच्या मोबदल्यात 15 ते 20 अर्जदारांना अशाचप्रकारे बनावट स्कोर कार्ड, सर्टिफिकेट आणि दुसरी इतर कागदपत्र तयार करून दिली आहेत.
महाराष्ट्र सायबर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आरोपींची चौकशी सुरू आहे व बनावट कागदपत्रे तयार करणे, हस्तांतरीत करणे आणि वापर करणाऱ्या संपूर्ण नेटवर्कचा पत्ता लावला जात आहे. पैशांची देवाण-घेवाण, डिजिटल डिव्हाइस आणि कम्युनिकेशन रेकॉर्डचाही जोमाने तपास सुरू आहे, जेणेकरून या रॅकेटमधील आणखीन लोकांची ओळख पटता यावी.
सायबर विभागाने सर्व परदेशी मेडिकल ग्रॅज्युएट्सला कठोर इशारा दिला आहे की, त्यांनी कोणत्याही दलालाच्या चक्करमध्ये पडू नये आणि FMGE सारख्या बंधनकारक परीक्षा टाळण्यासाठी अशा बनावट कागदपत्रांचा वापर करू नये. असे केल्यास कठोर कायदेशीर कारवाईला त्यांना सामोरं जाऊ शकते. त्याने त्यांच्या करिअरला धोका ही निर्माण होऊ शकतो.